सरपंचांना राजाश्रय देण्याचं काम महायुतीचे सरकार करेल : उदय सामंत;

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • तासगाव येथे सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न
  • जिल्ह्यातील शेकडो सरपंचांचा सहभाग

सांगली/तासगाव : ग्रामीण भागाच्या विकासासाठी सरपंचांना बळ देणे गरजेचे आहे. सर्व समस्या सोडविण्यासाठी माहायुतीचे सरकार
सरपंचांना राजाश्रय देऊन सक्षम करेल, असे आश्वासन उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केले.
सरपंच व प्रशासन यांच्यामध्ये संवाद घडवून आणण्यासाठी अखिल भारतीय सरपंच परिषद व श्री रामकृष्ण मिशन हार्टफुलनेस संस्थेच्या वतीने तासगाव येथे परशुराम मंगल कार्यालयात जिल्हास्तरीय सरपंच संवाद मेळावा उत्साहात संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन करताना पहिल्या सत्रात मंत्री उदय सामंत बोलत होते.

दीप प्रज्वलनाने मेळाव्याचे उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे,
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, तासगाव पंचायत समितीचे अधिकारी किशोर माने, श्री रामचंद्र मिशन, हार्टफुलनेस संस्थेच्या राज्य समन्वयक अंजली बापट, आमदार सुहास बाबर, सरपंच परिषदेचे संस्थापक अध्यक्ष जयंत पाटील कुर्डूकर, सरपंच पश्चिमचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदीप माने- पाटील शिवसेना सांगली जिल्हा प्रमुख आनंदराव पवार, महेंद्र चंडाळे, गौरव नायकवडी यांच्यासह मोठ्या संख्येने सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

सरपंच परिषदेचे राज्य संघटक अरुण खरमाटे यांनी स्वागत केले, सरपंच परिषदेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व मेळाव्याचे स्वागताध्यक्ष प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविक केले. आर. डी. पाटील यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शुभ संदेश वाचून दाखविला.

मंत्री उदय सामंत पुढे म्हणाले, प्रत्येक सरपंच आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीने काम केले पाहिजे. सरपंच हा गावचा मुख्यमंत्री असतो त्याच्या सहीमध्ये मोठी ताकद असते लोक एक वेळेस आमदाराला विसरतात परंतु सरपंचाला कधीही विसरू शकत नाहीत. प्रशासकीय व्यवस्थेमध्ये सरपंचाला अनन्य साधारण असे महत्त्व आहे. जे मंत्र्यांना जमत नाही ते सरपंच करून दाखवतात. गावाचा विकास हा सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमुळेच होतो. गावातील जनतेच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा सर्वात महत्त्वाचा माणूस कोण असेल तर तो सरपंच असतो. ग्रामपंचायत काम करत असताना कोणत्याही राजकारण आणता आडवा आडवी न करता लोकांची कामे करून सरपंचांनी मनी जिंकली पाहिजेत. असे आवाहन उदय सामंत यांनी केले.
उदय सामंत पुढे म्हणाले, सर्व सरपंचा मधून आमदार निवडण्याची मागणी आपण करत आहात परंतु त्याऐवजी प्रत्येक सरपंच हा आमदार झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण काम करावे. सरपंचाचे मानधन आणि विविध समस्यांच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्हीही उपमुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाईल. सरपंचांना राजाश्रय देण्याचं काम महायुतीचे सरकार करेल, ज्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. ‌ सरपंचांनी आपला आवाका ओळखून काम केले पाहिजे.
परिषदेचे संस्थापक जयंत पाटील कुर्डूकर यांनी सरपंच परिषदेच्या कारकिर्दीचा आढावा घेतला.

प्रदीप माने पाटील यांनी प्रास्ताविकामध्ये सरपंचांच्या समस्या आणि विविध मागण्यांच्या बाबत भूमिका मांडली. सरपंचाचे मानधन महिना तीस हजार रुपये करावे अशी मागणी केली.
जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगली जिल्हा नशा मुक्त करण्यासाठी गावोगावच्या सरपंचांनी सहकार्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या, पुन्हा एकदा लोकांचा गावाकडे ओढा वाढला आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लोकसंख्येच्या प्रमाणात तरगंती लोकसंख्या सांभाळणे ग्रामपंचायतींना जड जात आहे. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सरपंचांना कसरत करावी लागत आहे. अशा काळात लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करणे महत्त्वाचे आहे.

सरपंच परिषदेचे सांगली जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब कोडग, सांगली जिल्हाध्यक्ष रेखाताई रविंद्र पाटील,
पदाधिकारी कृष्णा पाटील, पोपट पाटील, राजू गुरव, शरद पाटील, शत्रुघ्न पाटील, चंद्रकांत कदम, सदाशिव माळी, विकास डावरे यांनी मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन जयदीप जाधव यांनी केले. श्री रामचंद्र मिशन, हार्टफुलनेस संस्थेचे कोल्हापूर विभागीय समन्वयक नितीन भोसले, प्रशिक्षक विकास पाटील, प्रशिक्षक अभिजीत खांडेकर, प्रशिक्षक गोविंद पाटील, नागेश पाटील, अभ्यासी विक्रांत गोरे, भूषण मगदूम यांचे सहकार्य लाभले.

Leave a Comment

और पढ़ें