प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : “ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार ” या ब्रीदवाक्याने ज्ञानदान करणाऱ्या पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाने शैक्षणिक शिखरे पार करतानाच क्रीडा क्षेत्रातही ठसा उमटविला आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने ६६ वी वरिष्ठ गादी व माती राज्यस्तरीय अजिंक्यपद महाराष्ट्र केसरी २०२४- २५ कुस्ती स्पर्धा दि.२६ ते ३० मार्च दरम्यान कर्जत जि. अहिल्यानगर येथे संपन्न झाली.या स्पर्धेमध्ये गादी विभागात ९७ किलो वजन गटात पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालयाचा बी.ए.भाग १ मध्ये शिक्षण घेत असलेल्या पैलवान प्रथमेश औताडे याने तृतीय क्रमांक पटकावून ब्रांझ पदकासह महाराष्ट्र चॅम्पियन होण्याचा बहुमान मिळवला.या उज्वल यशाबद्दल श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे अर्थसहसचिव प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे साहेबांच्या शुभहस्ते त्याचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.यावेळी बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले नियमित व्यायाम व कुस्तीच्या सरावाने आपल्याला ध्येयापर्यंत पोहचता येते. ग्रामीण भागातील आपले टॅलेंट टिकवून आई-वडिलांचे व महाविद्यालयाचे नाव देशभर पोहचविण्याचे आवाहन त्यांनी पैलवान प्रथमेशला केले. या सत्कार समारंभास सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल, महाविद्यालयातील प्राध्यापक, वडील अरविंद औताडे व मित्रमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.