Search
Close this search box.

माणसाने वैश्विक धर्म संमत सामंजस्याने वागावे : प.पू.परमात्मराज महाराज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : जगामध्ये असामंजस्यरूप भावनेने वागणाऱ्या लोकांची संख्या वाढल्याने संकटे वाढत आहेत. माणसाने वैश्विक धर्म सम्मत अशा सामंजस्याने वागणे आवश्यक असून सामंजस्ययुक्त भावनेत वाढ होऊन सुधारणा होण्यासाठी समाजात जागृती करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन प.पू. परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता.निपाणी) येथील संजीवनगिरीवरील श्रीदत्त देवस्थान मठाच्या वतीने आश्विन पौर्णिमेनिमित सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सकाळी श्रीदत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरणांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता नामजपानंतर आयोजित प्रवचनात बोलतांना प.पू. परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, टी.व्ही. पाहत बसलेल्या पाच दारुड्यांनी स्वतःचे एक टिव्ही चॅनेल काढू. व त्याचे नांव झिंगणे असे ठेवू, असे ठरवले. नशेमध्ये पोकळ बडबड करणाऱ्या लोकांना हित व अहित कळत नाही. मुलांनी अशा झिंगणाऱ्या वडिलांचे शो बघू नयेत. अशा वडिलांचे अनुकरण करू नये.
माणसांकडे समजूतदारपणा असावा. पुण्यवंत सगर राजाचा मुलगा उद्धट, उन्मत्त होता. तो साधुसंतांना, सामान्य जनतेलाही त्रास देत असे. त्याचे नांवच असमंजस् होते. नदीच्या काठावर खेळत असलेल्या, साधना करीत असलेल्या मुलांना नदीत उचलून टाकत असे. अशा प्रकारे अनेक मुलांनी प्राण गमावल्या नंतर पालकांनी राजाकडे तक्रार केली. तेव्हा राजाने स्वतःच्या पुत्राला राज्यातून हाकलून देण्याचा आदेश दिला. असमंजस् राजकुमाराला जंगलात सोडण्यात आले. तेव्हा त्याला पश्चात्ताप झाला. त्याने साधना केली. पुढे अनेक जन्मानंतर पूर्ण पापनाश होऊन त्याचा उद्धार झाला. सगर राजाने आपल्या मुलालाही कठोर शिक्षा केली. योग्य न्याय केला. याला सामंजस्य म्हणतात. जिथे संपूर्णत्व असते तेथे सामंजस्यरूप भाव असतो. जेथे संकुचितपणा असतो तेथे असमंजसपणा निर्माण होतो. संकुचित भावना विनाशाकडे नेणाऱ्या असतात.
भरपूर कष्ट करूनही मनाजोगे धन संपत्ती मिळत नाही. अशी समस्या घेऊन एक व्यक्ती एका साधूकडे गेली. मागील जन्माच्या पुण्याचा व दैवाचा हा भाग असतो. तुला गरजेपुरते धन मिळत राहील, असे साधूने सांगितले. परंतु त्याला अतिशय जास्त धन हवे होते. तेवढे न मिळाल्याने तो माणूस नास्तिक झाला. तो नास्तिक विचारांचे लेख लिहू लागला. त्यामुळे काही आस्तिक लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यांनी पोलिसांत तक्रार केली. तेव्हा त्या व्यक्तीला तुरुंगाची हवा खावी लागली.
भक्ती ही धन मिळवण्यासाठी करायची नसते. उद्धारासाठी भक्ती करावयाची असते. मागील जम्मातील कर्मावर आणि या जन्मातील मेहनतीवर आपली स्थिती अवलंबून असते. कोठ्यवधीची संपत्ती जरी असली तरी ती शेवटी कोणाला तरी द्यावी लागते.
सर्वांचे चांगले व्हावे यासाठी परमार्थ मार्ग आहे. माणसाने अतिरेकी हव्यास ठेवू नये. संत बसवेश्वर, ज्ञानेश्वर महाराज,गौतम बुद्ध, महावीरस्वामी आदी संतांनी सामंजस्याने वागण्याचा उपदेश केला आहे. अतिशय आकांक्षा ठेवल्याने माणूस बेभान होतो. बहुसंख्य लोक असमंजस असले म्हणून त्यांचा तो गुण चांगला आहे असे मानले जात नाही. उद्दंडपणाच्या वागण्यातून निश्चित हानी होत असते. जो साधे सरळ वागतो, ज्याच्या मनात कुटिलता नाही, जो कोणाचेही वाईट चिंतन करीत नाही त्यांचे तसे वागणे म्हणजे समंजसपणा होय. विशिष्ट दृष्टीने विशिष्ट कार्यासाठी मेंदूचा एखादा भाग अति महत्वाचा असू शकतो पण तत्त्वत: मेंदूचे सर्वच भाग गरजेचे आहेत. त्याप्रमाणे वैश्विक पातळीवर सर्व जाती धर्मातील लोक महत्वाचे आहेत. माणसाने सद्धर्माच्या विचारांचे आकलन करून घेऊन वागल्यास जगाचे चांगले होईल.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे, माजी मंत्री वीरकुमार पाटील, सचिन शेटे (सांगली), प्रा. डॉ. एम्. आर. खोत (सिंधुदुर्ग), पुंडलिक कुंडेकर ( बेळगांव), चंद्रकांत खामकर, वसंतराव चव्हाण, अभिजीत पाटील, संदीप पाटील, सौ.शांभवी मिरजे आदी मान्यवर व देणगीदारांचा तसेच गुरुवार अन्नदानकर्ते मनोज शिरगुप्पे, बाळासो केनवडे, रामचंद्र सुतार, सुनिल कवठे, राहुल कागले व मित्र परिवार यांचा शाल श्रीफळ देऊन प पू परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आडी, बेनाडी, हंचिनाळ, कोगनोळी, हणबरवाडी म्हाकवे, आणूर, सौंदलगा पंचक्रोशीसह कोल्हापूर, बेळगांव, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग इ. जिल्ह्यांसह कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील हजारो भाविकांनी अतिशय पाऊस असतानासुद्धा येऊन प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.

Leave a Comment

और पढ़ें