प्रतिनिधी – अतुल काळे
- तासगाव -कवठेमहांकाळ मध्ये उमेदवारी मिळण्यावरून पेच निर्माण
सांगली/तासगाव : राज्यात पावसाचे वातावरण असतानाच विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. विधानसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आणि तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाच्या राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित होऊ लागले आहे. पावसात सामान्य नागरिक वळचणीचा आश्रय घेत असताना विधानसभा निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारास पक्षाकडून संधी न मिळाल्यास कोणता उमेदवार कोणाच्या वळचणीला जाणार? याबाबत पेच निर्माण झाला आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. त्यानुसार तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघ 287 मध्ये दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान तर दि. 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट झाले. तारखा जाहीर झाल्याच्या दिवशी सायंकाळीच उमेदवारी निश्चित झालेल्या उमेदवाराकडून नागरिकात पोम्प्लेट वाटप सुरू झाले. आपला पक्ष आपल्याला उमेदवारी देणार याची ठामपणे गॅरंटी असल्याने मविआ कडून देण्यात येणारा उमेदवार उमेदवारीबाबत निश्चिंत झाला आहे. त्यामुळे मविआ मधील शिवसेनेमधून (उ.बा.ठा.गट) इच्छुक उमेदवाराने दुसऱ्या मार्गाने उमेदवारी मिळवण्यासाठी चाचपणी सुरू केली आहे.
महायुतीकडून तासगाव कवठेमहांकाळची जागा कोणाला मिळणार याबाबत अद्याप अस्पष्टता आहे. त्यामुळे महायुती मधील तीनही घटक पक्षांमधील इच्छुक उमेदवारांची आतुरता टांगणीला लागली आहे. भाजपकडून उमेदवारीबाबत कोणतीही गडबड होताना दिसून येत नाही. त्यामुळे भाजपमधून इच्छुक उमेदवारावर टांगती तलवार कायम आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (अजित पवार गट) हालचाली गतिमान झाल्या असून तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाची जागा आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला जागा आल्यास मतदारसंघात पक्षाचा भक्कम उमेदवार दिसून येत नाही. राष्ट्रवादी काँग्रेसला आयत्या वेळेला उमेदवार आयात करावा लागणार आहे. त्यामुळे मविआ आणि महायुती यांच्यात उमेदवारी वरून होणाऱ्या कलहा मध्ये कोणता इच्छुक उमेदवार कोणत्या पक्षाच्या वळचणीचा आश्रय घेणार? याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.