प्रतिनिधी – अतुल काळे
- शहरातील दोन राम मंदिर व्यवस्थापनांची संयुक्तपणे शोभायात्रा
- श्रीरामांच्या गजरात दुमदुमली तासगाव नगरी
सांगली /तासगाव : तासगाव शहरात असणाऱ्या दोन श्रीराम मंदिर व्यवस्थापनाने संयुक्तपणे काढलेली श्रीराम शोभायात्रा लक्षवेधी ठरली असून गुढीपाडव्याच्या सायंकाळी शहरातून निघालेल्या या शोभायात्रेमुळे श्री रामाच्या जयघोषात तासगाव नगरी पावन झाली.
तासगाव शहरातील श्रीराम मंदिर, सिद्धेश्वर रोड आणि श्रीराम मंदिर, दाणे गल्ली या दोन्ही मंदिराच्या व्यवस्थापनाने संयुक्तपणे रविवार दि. 30 रोजी श्रीराम शोभायात्रेचे आयोजन केले होते. या शोभायात्रेस नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. सायंकाळी 5::30 च्या सुमारास श्रीराम मंदिर वंदे मातरम चौक येथून शोभायात्रेस सुरुवात झाली. अश्वरथात प्रभू श्रीरामांची मूर्ती विराजमान करण्यात आली होती. अग्रभागी भगवा ध्वज, हनुमानाची बारा फुटी प्रतिकृती, तासगावचे प्रसिद्ध श्री गणेश झांज पथक, हलगी पथक, पांडुरंग शिक्षण संस्था धामणीच्या विद्यार्थ्यांचे वारकरी पथक, आरवडे येथील इस्कॉन मंदिरचे हरेकृष्ण पथक, घोड्यावर स्वार असलेले बाल शिवाजी आदींसह दोन्ही श्रीराम मंदिराचे कार्यकर्ते, शेकडो नागरिकांच्या सहभागाने ही शोभायात्रा श्रीराम मंदिर वंदे मातरम चौक पासून सिद्धेश्वर चौक, कोकणे कॉर्नर, विष्णू गल्ली, दाणे गल्ली (श्रीराम मंदिर), माळी गल्ली, विटा नाका, एस टी स्टँड चौक, शिवतीर्थ, गुरुवार पेठ, गणपती मंदिर, पागा गल्ली, पोस्ट ऑफिस, जोशी गल्ली, वंदे मातरम चौक श्रीराम मंदिर या मार्गे काढण्यात आली. दरम्यान फटाक्यांची मोठी आतषबाजी करण्यात आली. दाणे गल्ली येथील श्रीराम मंदिर येथे शोभायात्रा पोहोचल्यानंतर स्वप्निल यांचे कुटुंबीय तसेच महिला भाविकांनी श्रीरामांचे औक्षण केले तर हि शोभायात्रा शिवतीर्थ येथे पोहोचल्यानंतर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कडून स्वागत करण्यात आले. यानंतर ध्येय मंत्र पठण करण्यात आला. श्री रामदेव ट्रस्टचे अध्यक्ष दिलीप जोगळेकर आणि श्री राम मंदिर चे व्यवस्थापक स्वप्निल पैलवान यांच्या नियोजनातील ही श्रीराम शोभायात्रा तासगाव शहरात लक्षवेधी ठरली.