प्रतिनिधी – अतुल काळे
- स्व. आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजन
सांगली/तासगाव :माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर. आर. ( आबा ) पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त रोहित (दादा) कल्चरल ग्रुप व जिव्हाळा सोशल फाऊंडेशनच्यावतीने तासगाव येथे सोमवार दि. १७ ते गुरुवार दि.२० फेब्रुवारी या कालावधीत लक्षवेधी व्याख्यानमाला आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती रोहितदादा कल्चरल ग्रुपचे व तासगाव मार्केट कमिटीचे माजी चेअरमन रवी पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वप्नील जाधव, अभिजित पाटील, बाळासाहेब सावंत व उपस्थित होते.
पाटील पुढे म्हणाले, आर. आर .पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व. जिल्हा परिषद सदस्य ते राज्याचे उपमुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास स्वकर्तृत्वाचा. सत्ताकाळात त्यांनी दूरदृष्टीने घेतलेले निर्णय, राबविलेल्या योजना अत्यंत प्रभावी ठरल्या आहेत. वक्तृत्व आणि कर्तृत्वाने जनसामान्यांच्या मनावर वेगळा ठसा उमटविणाऱ्या आर. आर. आबांच्या स्मृती जपल्या जाव्यात या हेतूने जिव्हाळा सोशल फाउंडेशन व रोहितदादा कल्चरल ग्रुपच्या माध्यमातून त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रत्येक वर्षी लक्षवेधी व्याख्यानमाला आयोजित केली जाते.
यावर्षी सुद्धा तासगाव येथील रोहितदादा कल्चरल ग्रुपच्यावतीने यंदा लक्षवेधी व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. व्याख्यानमालेचा प्रारंभ सोमवार दि.१७ रोजी तासगाव येथील नगरपरिषदेच्या साने गुरुजी नाट्यगृहात सायंकाळी ६.३० वाजता युवा नेते आमदार रोहित पाटील यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी सांगली जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अशोक काकडे व माजी आमदार सुमनताई पाटील उपस्थिती राहणार आहेत.
व्याख्यान मालेच्या पहिल्या दिवशी सोमवार दि.१७ रोजी लोककला अभ्यासक व कलावंत संपत कदम यांच्या भूपाळी ते भैरवी या सांस्कृतिक कार्यक्रमाने व्याख्यानमालेचा प्रारंभ होणार आहे. मंगळवार दि.१८ रोजी लोककवी प्रा. प्रशांत मोरे ( मुंबई ) यांचा ‘बाप सांगतो आईची कहाणी’ हा कवितांचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी प्रांताधिकारी उत्तम दिघे यांची प्रमुख उपस्थिती आहे. बुधवार दि.१९ रोजी शिवाजी विद्यापीठ मराठी विभागाचे प्रा.डॉ.रणधीर शिंदे यांचा ‘शिवरायांचा महाराष्ट्रधर्म’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. यावेळी तहसीलदार अतुल पाटोळे , नगरपरिषदेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर बुधवार दि. २० रोजी माजी केंद्रीय मंत्री तथा नांदेड च्या खासदार सुर्यकांता ताई पाटील यांचे ‘महाराष्ट्राच्या राजकारणातील सुसंस्कृत चेहरा – आर. आर आबा’ या विषयावर स्व. आर.आर.(आबा) यांच्या नेतृत्वातील अनेक पैलू उलगडणार आहेत. या कार्यक्रमास अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोखर यांची प्रमुख उपस्थिती आहे.
व्याख्यानमाला दररोज सायंकाळी ६:३० वाजता तासगाव येथे साने गुरुजी नाट्यगृहात होणार आहे. व्याख्यान मालेचे संयोजन रामचंद्र खानापुरे, कपिल माळी, स्वप्नील जाधव, अभिजित पाटील, अनिल पाटील व रोहितदादा कल्चरल ग्रुप, जिव्हाळा सोशल फाउंडेशनचे कार्यकर्ते करीत आहेत.