प्रतिनिधी – अतुल काळे
- निकालापूर्वी रोहित पाटील यांचा डिजिटल कवठेमहांकाळ मध्ये झळकला
- कवठेमहांकाळकरांचा अंदाज बरोबर की चूक? याची चर्चा
सांगली/तासगाव : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच उत्साही कार्यकर्त्यांनी घाई गडबडीने आपल्या आवडत्या नेत्याचा बॅनर रात्री लावला आणि तोच बॅनर पहाटे उतरवण्यात आला असल्याने चर्चेला तोंड फुटले असून कार्यकर्त्यांना आपल्या नेत्याच्या विजयाची गॅरंटी असल्याचेही दिसून येत आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मधील निकाल पूर्व संध्येची परिस्थिती पाहता कवठेमहांकाळ येथील कार्यकर्त्यांनी त्यावेळी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचा खासदार असा उल्लेख असलेला डिजिटल झळकावला होता. या डिजिटल चा फोटो सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात वायरल झाला आणि चर्चेत आला. निकालापूर्वीच विशाल पाटील निवडून येणार याची खात्री कार्यकर्त्यांना होती आणि निकालावेळी विशाल पाटील खासदार झाले सुद्धा. या निवडणुकी वेळी विशाल पाटील यांना कवठेमहांकाळ मधील माजी मंत्री अजितराव घोरपडे यांचे पाठबळ मिळाले. तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील आर आर आबा पाटील गटाने विशाल पाटील यांना मदत केली. लोकसभा निवडणुकीत विशाल यांची ताकद वाढली आणि ते तब्बल 1 लाख हून अधिक मतांनी निवडून आले. कवठेमहांकाळकरांचा अंदाज खरा ठरला. विशाल पाटील खासदार म्हणून निवडून आले.
विधानसभा निवडणूक 2024 साठीचे मतदान बुधवार दि. 20 रोजी पार पडले. तासगाव कवठेमंकाळ मतदारसंघातील निवडणूक ही चुरशीची ठरली. आबा काका गटामध्ये मोठी चुरस निर्माण झाली. या निवडणुकीमध्ये अजितराव घोरपडे गटाने आबा गटाच्या विरोधी भूमिका घेतली. अजितरावांची विरोधी भूमिका काका गटात पथ्यावर पडली. मतदान प्रक्रिया संपल्यानंतर नागरिकात उत्सुकता निर्माण झाली. कोण होणार आमदार ? याची जोरदार चर्चा सुरू असताना दि. 21 च्या रात्री कवठेमहांकाळ येथे आमदार रोहित पाटील असा डिजिटल बॅनर उभा करण्यात आला. परंतु शुक्रवार दिनांक 22 च्या सकाळी सदरचा डिजिटल उतरवण्यात आला असल्याचे दिसून आले. डिजिटल लावला आणि उतरवला याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आमदार कोण ? या प्रश्नासोबत कवठेमहांकाळकरांचा अंदाज बरोबर की चूक? असा सवालही चर्चेस पात्र ठरला आहे. या सवालाचा निकालही शनिवार दि. 23 रोजी लागणार आहे.