लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे : पॅरा ऑलम्पिक पदक विजेता सचिन खिलारी
प्रतिनिधी – अतुल काळे
वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात नव मतदार संवाद मेळावा
सांगली/तासगाव : भारताचा तिरंगा झेंडा पॅरिसमध्ये फडकविताना खूप अभिमान वाटला. आपल्या लोकशाहीला बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावे असे उद्गार पॅरा ऑलम्पिक पदक विजेता आणि सांगली जिल्हा आयकॉन सचिन खिलारी यांनी पद्मभूषण डॉ.वसंतरावदादा पाटील महाविद्यालय तासगाव येथे आयोजित नव मतदार संवाद मेळाव्यात बोलताना काढले. २८७ तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील नवीन मतदारांसाठी स्वीप अंतर्गत आयोजित मेळाव्यात बोलताना ते पुढे म्हणाले, मी मतदान करणार आहे. तुम्हीही मतदान करा.
संविधानाने दिलेला अधिकार आणि हक्क सर्वांनी बजावण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. सर्वांनी मतदान जनजागृती करा,चांगला माणूस बना, खेळातून चांगले करिअर करता येते हे सांगून मी कसा घडलो याचे विद्यार्थ्यांसमोर कथन करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करून प्रेरणा दिली.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी चंद्रकांत बोडरे यांनी भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीसाठी केलेल्या तयारीची माहिती सांगितली. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठीचे नियोजन सांगितले. गटविकास अधिकारी किशोर माने म्हणाले, समाजाचा चांगला नागरिक बना आणि प्रत्येकाने मतदान करा असे कसांगून विद्यार्थ्यांना मतदान करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांना निपक्षपातीपणे मतदान करण्याची शपथ दिली.
अध्यक्षस्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ.मिलिंद हुजरे म्हणाले, ध्येय समोर ठेवून यशाच्या शिखरापर्यंत आपण पोहोचू शकतो खेळातून करियर करण्याचे आवाहन त्यानी विद्यार्थ्यांना केले. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन सर्वांनी स्वतःमतदान करावे आणि दुसऱ्याला मतदान करण्यासाठी प्रेरित करावे असे सांगितले.यावेळी २०० मीटर धावणे राज्यात द्वितीय आलेल्या व राष्ट्रीय स्पर्धेत निवड झालेल्या कु.अदिती सरवदे व क्रॉस कंट्रीत सहभाग घेतलेली कु.कमला चौधरी यांचा सत्कार सचिन खिलारी यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्वीप नोडल अधिकारी आबासाहेब लावंड यांनी केले तर आभार महाविद्यालयाचे नोडल अधिकारी डॉ.साईनाथ घोगरे यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. कार्यक्रमाला स्वीप नोडल अधिकारी चंद्रकांत माळी, शिक्षण विस्तार अधिकारी रामचंद्र राठोड, सौ.शोभा जाधव,स्वीप पथक सदस्य दत्ता गळवे व प्रवीण कांबळे यांसह राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. तातोबा बदामे,एनसीसी चे कॅप्टन विनोदकुमार कुंभार, प्रभाकर पाटील डॉ.शहाजी पाटील, प्रा.पल्लवी मिरजकर,डॉ.नितीन गायकवाड,ज्युनिअर विभाग प्रमुख एस.डी.पाटील, प्रा.राजू काळभोर, प्रा. विलास साळुंखे,डॉ.दत्तात्रय थोरबोले यांसह महाविद्यालयातील प्राध्यापक विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.