कोण रे तो जो जनतेचे पैसे गोव्यात उधळतो त्याला पराभुत करा : गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आवाहन ; कडेगावात प्रचंड गर्दीत भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांच्या विजयाचा संकल्प.
सांगली/कडेगाव न्युज:-रिपोर्टर सुहास कराडकर.
इतरांची पिळवणूक करून आपल्या संस्था मोठ्या करणाऱ्या आणि जनतेचे महाराष्ट्रातले पैसे गोव्याच्या निवडणुकीत आणून उधळणाऱ्या कॉग्रेस उमेदवारास पराभूत करा आणि आपला हक्काचा विकासाचे ध्येय असणाऱ्या तसेच नोकरीच्या आमिषाला बळी न पडता पुढील पाच वर्षात स्वतःचे उद्योग व्यवसाय उभारण्याचे ध्येय ठेवुन स्वतःच्या पायावर उभे रहा युवकाना आत्मनिर्भार करण्याचा संकल्प करणाऱ्या भाजपाच्या संग्राम देशमुख यांना विजयी करा, असे आवाहन गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. पलूस कडेगाव विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टी महायुतीचे अधिकृत उमेदवार संग्राम देशमुख यांच्या प्रचारासाठी कडेगांव येथील स्व. सुरेशबाबा देशमुख चौक येथे झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. कडेगाव तालुक्यातील नागरिकांनी या सभेला प्रचंड गर्दी केले होती. काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी या सभेत भाजपमध्ये प्रवेश केला. तर अनेक संघटनांनी संग्राम देशमुख यांना पाठिंबा जाहीर केला. नगराध्यक्ष धनंजय देशमुख यांच्या हस्ते प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख, माजी आमदार महांतेश कवठगीमठ, भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील, भाजपा कडेगाव तालुका अध्यक्ष अशोक साळुंखे, महाराष्ट्र क्रांती सेनेचे कृष्णात भिसे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे बोधीसत्व माने, जयभवानी उद्योग समूहाचे प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कडेगांव तालुकाध्यक्ष कृष्णात मोकळे, युवा नेते विश्वतेज देशमुख यांची भाषणे झाली.
डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, गोव्याच्या निवडणुकीत मला हरवण्यासाठी काँग्रेसचा उमेदवार दहा कोटी रुपये घेऊन आला होता अशी कबुली माझ्या विरोधात निवडणूक लढवलेल्या काँग्रेसच्याच उमेदवाराने दिली होती. कोण तो माणूस महाराष्ट्राचा पैसा गोव्यात उधळतो त्याचा पराभव करण्यासाठी मी इथे आलो आहे. इतरांची पूर्ण करून त्याचा संस्कार करण्याचे काम मंडळी करत आहेत. काँग्रेसवाल्यांना इतर ठिकाणी उधळायला पैसे आहेत परंतु तरुणांना रोजगार द्यायला, शेतकऱ्यांना मदत करायला आणि महिला शक्तीला सक्षम करायला त्यांच्याकडे वेळ नाही. त्यामुळे अशा पिळवणूक करणाऱ्या अपप्रवृत्तीला रोखण्याची जबाबदारी तुमची आमची सर्वांची आहे. आणि तुम्ही अशा माणसाला रोखले पाहिजे. समोरचा शत्रू पैशाने कितीही श्रीमंत असेल परंतु आपण सर्वजण मनाने श्रीमंत असणारी माणसं आहोत. सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार करणारी माणसं आहोत. इथला तरुण शेतकरी समृद्ध करायचा असेल तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणं गरजेचं आहे. तीस वर्षांपूर्वीच्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती करा आणि संग्राम देशमुख यांना विजयी करा. युवाशक्ती, नारीशक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण या चार सूत्रावर भारतीय जनता पार्टी देश चालवते. त्यामुळे तुमच्या भागाचा आणि राज्याचा विकास करायचा असेल तर संग्राम देशमुख यांनाच विजयी करा महायुतीचा सरकार आणा, असे आवाहन डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.
संग्राम देशमुख म्हणाले, गेल्या कित्येक वर्षात मतदार संघाचा विकास झाला नाही. माजी आमदार संपतराव अण्णा यांनी पाणी आणलं नसतं तर आपण काय केलं असतं. टेंभू योजना आणली म्हणून घराघरात समृद्धी आली. या पुढच्या काळात आपल्याला मोठ-मोठे उद्योग आणायचे आहेत तरुणांना काम द्यायचं आहे शेतकऱ्यांचा विकास करायचा आहे. मुंबई पुण्याला नोकरीच्या ऑर्डर काढणाऱ्या माणसाला सुद्धा आपण मतदार संघात नोकरी देण्याची व्यवस्था करू. त्यासाठी तुम्ही सर्वजण साथ द्या आणि मतदारसंघाचा विकासचा बॅकलॉग भरून काढण्यासाठी मला निवडून द्या असे आवाहन संग्राम देशमुख यांनी केले.
संग्राम मतदार संघ एक एक नंबरचा करेल
पृथ्वीराजबाबा देशमुख म्हणाले, संपतराव अण्णांच्या मुळे टेंभू योजना सुरू झाली. महायुती सरकारने टेंभू आणि ताकारी योजनेचे लाईट बिल 81 टक्के भरण्याचा निर्णय घेतला त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आणि ही योजना चालू राहिली. जिल्हा परिषद अध्यक्ष असताना संग्राम देशमुख यांनी देशात एक नंबरची जिल्हा परिषद करून दाखवली त्याचप्रमाणे संग्राम पलूस कडेगाव हा मतदार संघ देशात एक नंबरचा करेल. त्यासाठी त्याला मोठ्या फरकाने विजयी करा. केंद्र व राज्य सरकारने आपल्याला खूप काही दिले आहे आता मत देण्याची वेळ आपली आहे.
२३ तारखेच्या गुलालाचं बुकिंग
युवक विश्वतेज देशमुख म्हणाले, आमच्या कार्यकर्त्यांना कोण दमदाटी करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तलवारी फक्त म्यान केल्या आहेत त्याची धार गेलेली नाही. जनतेने निवडणूक हातात घेतली असून या ठिकाणी मतदारसंघातून उत्स्फूर्तपणे आलेल्या कार्यकर्त्यांची गर्दी पाहिली की असं वाटतं 23 तारखेच्या गुलालाच बुकिंग आत्ताच केलं पाहिजे.