प्रतिनिधी – अतुल काळे
- भाविकांच्या श्रद्धा – सहयोगाने दोन दिवसीय महायज्ञ सोहळा संपन्न
- भाविकांच्या मनातील शक्तीभावना ही धार्मिक सोहळे अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडण्यात मोठी भूमिका बजावतात : प.पू. परमात्मराज महाराज
सांगली/ तासगाव : आडी ( ता. निपाणी) येथील संजीवन गिरीवरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने महान पर्व काळात आयोजित श्रीदत्त याग रूप महायज्ञाचा सोहळा बुधवार दि 5 रोजी सायंकाळी सहा वाजता पूर्णाहूती आणि महाआरतीने हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
” भाविकांच्या मनातील भक्तिभावना ही धार्मिक सोहळे अत्यंत व्यवस्थितपणे पार पाडण्यात मोठी भूमिका बजावत असते. भाविकांच्या मनातील दृढ श्रद्धा ही मोठमोठ्या धार्मिक कार्यक्रमांचा एक मुख्य आधार ठरत असते. सर्व भक्तांच्या अत्यंत श्रद्धेमुळे व सहयोगामुळेच दत्तयागाचे अत्यंत सफल आयोजन घडले आहे,” असे मत परमपूज्य परमात्मराज महाराजांनी श्री दत्तयागाच्या दुसऱ्या दिवशी व्यक्त केले आहे.
संजीवनगिरीच्या पायथ्याशी सुप्राद्य वल्भालयाच्या प्रांगणात भव्यमंडप उभारून अनेक यज्ञकुंड बांधण्यात आले होते. केळीच्या, नारळीच्या व आंब्यांच्या डहाळ्यांनी तसेच फुलांनी यज्ञ मंडप सजविण्यात आला होता. यावेळी मंगळवार दि. 4 रोजी सकाळी श्री दतगुरूंच्या प्रतिमेसह ब्रह्मदेव, विष्णू, महेश तसेच ६४ योगीनी १६मातृका देवी, नवग्रह देवता आदी दैवतांची विधीवत स्थापना प.पू . परमात्मराज महाराज, देवीदास महाराज तसेच आश्रमस्थ साधकांच्या हस्ते करण्यात आली. समस्त भाविकांना श्री दत्तगुरूंचा कृपाशीर्वाद लाभावा तसेच पारमार्थिक व व्यावहारिक सौख्य लाभावे, यासाठी प.पू परमात्मराज महाराज यांच्यासह सक्रिय भाविकांनी संकल्प करून दत्तयाग रूप महायज्ञाचा शुभारंभ झाला होता. श्री दत्तयाग सोहळ्यात विविध मंत्र पठणाच्या घोषात परिसर भक्तिमय वातावरणात न्हाहून गेला होता. यज्ञकुंडातील देदिप्यमान अग्नीमध्ये समिधा व द्रव्य अर्पण करीत मंत्र घोष करतांना भाविकांमध्ये प्रचंड उत्साह दिसत होता. दोन दिवस चाललेल्या दत्तयाग महायज्ञाची सांगता बुधवारी सांयकाळी पूर्णाहुती व महाआरतीने झाली.
या दत्तयागरूप महायज्ञ सोहळ्याला आम. शशिकला जोल्ले, युवानेते राहूल सतीशअण्णा जारकीहोळी, माजी आम. सुभाष जोशी, युवानेते उत्तम अण्णा पाटील बोरगांवकर, लक्ष्मणराव चिंगळे, चंद्रकांत कोठीवाले, मदन भंडारी कोल्हापूर, मारूती कोकणे पुणे, उद्योगपती नामदेव थोरात कराड, उद्योगपती एस्.टी. पाटील कोल्हापूर, उद्योगपती राजेंद्र शेटे हुपरी, उद्योगपती सिद्धराम पाटील कोल्हापूर, एम्.व्ही. वाली निपाणी, उद्योगपती इरेस्वामी इटगोणी चिक्कोडी, पोलीस तपासचे दिलावर महात डॉ. अंकित उपाध्ये, ज्येष्ठ नेते रामगोंडा पाटील खडकलाट आदी मान्यवरांनी भेट देऊन पारमार्थिक कार्यक्रमाचा लाभ घेतला. यावेळी आडी पंचक्रोशीतील तसेच कर्नाटक महाराष्ट्र गोवादी राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी पारमार्थिक लाभ घेतला.