प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : तोंडात सोन्याचा चमचा घेऊन आलेल्यांना संधी देऊ नका, सर्वसामान्य उमेदवाराला संधी द्या असे आवाहन तासगाव कवठेमंकाळ मतदार संघातील मतदारांना बहुजन समाज पार्टीचे अधिकृत उमेदवार डॉ. शंकरदादा माने यांनी तासगाव येथे केले. डॉ. शंकरदादा माने यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, शोषित, वंचित, सामान्य जनतेच्या हाताला काम मिळण्यासाठी आमचा लढा आहे. प्रस्थापित नेत्यांना निवडून देण्यापेक्षा नवीन सर्वसामान्य माणसाला सेवेची संधी द्या. चिंचणी आणि अंजनी गावातील 25 मुलं नोकरीला लागलेली दाखवा असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. येथील आमदार खासदार हे मुके आहेत. लोकसभेत आणि विधानसभेत त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही. असा घणाघात त्यांनी केला. तासगाव कवठेमहांकाळ मध्ये पाण्याच्या मुद्द्यावरून राजकारण सुरू आहे. टेंभू योजनेची सुरुवात झाली त्यावेळेला युवा नेत्याचा जन्मही झाला नव्हता. अशी टीका त्यांनी यावेळी केली.