तासगांव पोलीस ठाण्यात जागतिक महिला दिन संपन्न

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगांव : स्वावलंबी भारत अभियान आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने तासगांव पोलीस ठाण्यातील सभागृहात जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक मा. दिपक पाटील यांनी प्रास्तविक केले. त्यांच्या हस्ते व्यासपीठावरील मान्यवरांचा गुलाब पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्यानंतर प्रमुख पाहुणे डॉ. प्रविण शिंदे व डॉ. सोनल शिंदे यांच्या हस्ते पोलीस ठाण्यातील सर्व महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. सुरज मराठे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला.
प्रमुख वक्ते आणि जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग येथे मध्यस्त म्हणून कार्यरत असलेले मा. मिलींद सुतार हे आपल्या भाषणात म्हणाले कि संयुक्त राष्ट्र महासंघाने ८ मार्च १९७५ ला जागतिक महिला दिन साजरा करण्यास सुरुवात केली. त्यामुळे आजचा जागतिक महिला दिन हा सुवर्ण महोत्सवी आहे. अमेरिकेत महिलांना मतदानाचा अधिकार मिळण्यासाठी तेथील महिलांना आंदोलन करावे लागले. याउलट भारतात खुप आधीपासून महिलांचा थेट प्रशासनात सहभाग होता. याचे उदाहरण म्हणजे राज माता जिजाऊ, शिवरायांची सून ताराराणी तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर हि ठळक उदाहरणे आहेत. यावेळी सुतार म्हणाले कि आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर मेट्रो उमन म्हणून यशस्वी झालेल्या मा. अश्विनी भिडे यांची यशोगाथा थोडक्यात सांगितली. कारण त्यांचे माध्यमिक शिक्षण तासगांव येथील चंपाबेन वाडीलाल ज्ञानमंदिर या शाळेत झाले असल्याने मी त्याचा साक्षीदार आहे, आणि एक तासगांव कर म्हणून याचा मला अभियान आहे. आपले घरसंसार आणि मुलंबाळं हे सर्व सांभाळून ज्या महिला नोकरी करतात त्यांच्या कार्यक्षमतेचा आणि धडपडीचा गौरव होणे आवश्यक असल्याने अशा कार्यक्रमांचे आयोजन आम्ही गेली ३ वर्षे सलग करत आहोत.
सांगली महापालिकेच्या माजी नगरसेविका आणि स्वा. भा. अभियानाच्या समन्वयक सौ. गीतांजली धोपे पाटील म्हणाल्या कि महिला कितीही मोठ्या पदावर गेली तरी घरी गेल्यावर तिला स्वयंपाक करावा लागतोच. स्वतः पेक्षा कुटुंबाचा जास्त विचार करावा लागतो, मात्र या सर्व गोष्टींवर मात करून सुद्धा ज्या महिलां यशस्वी होतात, त्यांचा गौरव होणे आवश्यक आहे. त्यानंतर डॉ. प्रविण शिंदे यांनी अचानक एखादा माणूस आपल्यासमोर बेशुद्ध पडला तर त्याच्यावर प्राथमिक उपचार कसे करावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी पोलीस ठाण्यातील स्त्री, पुरुष कर्मचारी तसेच दिपक शेटे, पवन गंगवानी आदी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. तासगांव येथील महिला पोलीस कर्मचारी श्रीमती नलवडे यांनी उपस्थितांचेआभार मानले.

Leave a Comment

और पढ़ें