रामराज्य आणि राम जन्मभूमी….

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • प्रभू श्रीरामचंद्रांच्या अयोध्या येथील राममंदिर प्राणप्रतिष्ठेला दिनांकानुसार होणाऱ्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने

सांगली/ तासगाव :

लोकाभिरामं रणरङ्गधीरं
राजीवनेत्रं रघुवंशनाथं।
कारुण्यरूपं करुणाकरं तं
श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये॥

श्रीरामरक्षा स्तोत्रातील हा श्लोक. या श्लोकात बुधकौशिक ऋषींनी प्रभू श्रीरामचंद्रांचे आणि एका अर्थाने रामराज्याचे वर्णन नेमकेपणाने केले आहे. लोकांना आनंद देणारा, रणांगणात पराक्रम गाजवणारा,कारुण्यांचे रूप असणाऱ्या आणि शरणागतावर दया करणाऱ्या श्रीरामाला मी शरण जातो. असा सदरच्या श्लोकाचा अर्थ होतो. वारंवार ज्या रामराज्याचा दाखला दिला जातो,ज्या रामराज्याचा उल्लेख राष्ट्रपिता महात्मा गांधींनी आपल्या लेखनात सुद्धा अनेक वेळा केला ते श्रीरामाचे राज्य खऱ्या अर्थाने कसे होते? रामराज्य म्हणजे नेमके काय? ही संकल्पना आधी संपूर्ण समजून घ्यावी लागेल.
कुठलेही राष्ट्र अस्तित्वात यायचे असेल तर भूप्रदेश, लोकसंख्या,सार्वभौमत्व आणि शासनव्यवस्था हे चार घटक एकत्र यावे लागतात तेव्हा खऱ्या अर्थाने राष्ट्र बनते.यातील शासनव्यवस्था हा घटक कल्याणकारी ‘शासन व्यवस्था’ या अर्थाने लोकशाही संकल्पनेत महत्त्वाचा मानला जातो. तेव्हा ज्या राष्ट्रात अथवा राज्यात शासन व्यवस्था ही स्वार्थी नसून, आपल्यापुरताच विचार करणारी नसून, क्षणोक्षणी प्रजेचे कल्याण चिंतणारी असते ती खऱ्या अर्थाने रामराज्याची संकल्पना आहे. रामराज्य असे की, ज्यात लोक आपल्या इच्छा- आकांक्षांनी आपल्या राजाच्या आणि राज्याच्याही कल्याणाचाच विचार करतात,तर राजा हा सुद्धा प्रजेच्या हिताचाच विचार करणारा प्रभु श्रीरामासारखा असतो.असे रामाचे राज्य अस्तित्वात होतेच म्हणूनच बुधकौशिक ऋषींनी सदरचा श्लोक रचला असेल यात मला तरी कुठलीही शंका वाटत नाही. ‘राम’ हा लोकांचा राजा होता,तो रणांगणात पराक्रमी तर होताच तरीही कारूण्याची मूर्ती होता. त्याच्या प्रत्येक कृतीतून प्रजेच्या कल्याणाची भावना व्यक्त होत असे आणि म्हणूनच गेली ७००० वर्ष लोककल्याणकारी राज्याच्या संकल्पनेला आपण रामराज्याची उपमा देतो.ज्या राज्यात कोणी दुःखी नाही, सर्वजण आनंदी आहेत,संतुष्ट आहेत आणि मुख्यत्वे समाधानी आहेत असे रामाचे राज्य होते. म्हणूनच आजही क्षणोक्षणी आपण राम आठवतो,इतकेच काय जालीम औषधालाही आपण रामबाण म्हणतो,व्यक्ती निधन पावला की राम राहिला नाही असेही म्हणतो, इतका ‘राम’ आपल्या मनात राज्य करून आहे.
पण तरीही याच रामाच्या जन्माबद्दल संशय व्यक्त केला जातो. प्रत्यक्ष प्रभू श्रीरामांनी सीतामातेला आणण्यासाठी वानरांच्या मदतीने बांधलेला रामसेतू अस्तित्वातच नाही असे म्हटले जाते. इतकेच नव्हे तर त्याच रामाच्या जन्मस्थानाच्या लढ्यासाठी १ ,२ नव्हे तब्बल ५०० वर्षांचा लढा द्यावा लागतो.तेव्हा लक्षात येते की,आम्ही कदाचित आमच्यातल्या त्या रामाला विसरलो किंवा परकीय संस्कृतीमुळे, आक्रमणांमुळे,आमच्या मनातील रामाला आम्ही हरवून बसलो की काय? अथवा श्रीरामाला विस्मृतीत टाकले काय? पण खरे सांगू का, आम्ही आमच्यातील खऱ्या रामाला ओळखलेच नाही.कारण बुधकौशिक ऋषींनी श्लोकात वर्णन केलेला’ राम ‘हा लोकांना आनंद देणारा, लोकांबद्दल करूणा असणारा आहेच, पण त्यासोबत तो रणकुशल आहे. कारण शक्तीने मिळती राज्ये, युक्तीने यत्न होत असे।शक्ती युक्ती जये ठायी,तेथे श्रीमंत धावती॥
असे प्रत्यक्ष समर्थ उगाच म्हणून गेलेले नाहीत. ते द्रष्टे होते ,भविष्यातील समाजाची स्थिती काय असेल? याचे ज्ञान त्यांना होते. त्यांना वास्तव परिस्थितीची जाण होती. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते की, लोककल्याणकारी राज्याची, रामराज्याची संकल्पना तेव्हाच शाश्वत टिकेल, जेव्हा त्याला शक्तिची जोड मिळेल, तेव्हाच परकीय शत्रू आपल्या संप्रदायाच्या वाईट सावल्या भारतीय संस्कृतीच्या शाश्वत प्रतीकांवर टाकणार नाही, त्यामुळे रामराज्य हे आपल्या भारतीय संस्कृतीत अस्तित्वात होतेच.परकीय आक्रमणांमुळे आमच्या सनातन संस्कृतीतील रामराज्याची मूल्य आम्ही विस्मृतीत टाकली आणि परकीयांचे अंधानुकरण सुरू केले. त्यामुळे आमची अधोगतीकडे वाटचाल सुरू झाली. जेव्हा आमच्या विस्मृतीत गेलेला हा प्रत्येकाच्या मनातील राम आम्ही जागवू तेव्हा रामजन्मभूमी ही केवळ राम जन्मभूमी न राहता ते राष्ट्रमंदिर होईल.हे राष्ट्रमंदिर समाजाला निश्चितच रामराज्याच्या संकल्पनेकडे घेऊन जाईल आणि हे रामराज्य संपूर्ण जगताच्या संस्कृतींना मार्गदर्शक ठरेल आणि या भारतभूमीला पुन्हा एकदा विश्वगुरूपदी विराजमान करेल यात तिळमात्र शंका नाही.
धन्यवाद!
– नितीन जोशी,
तासगाव, मोबा. 7588833388

Leave a Comment

और पढ़ें