तासगाव – कवठेमहांकाळमध्ये कौशल्य विकास केंद्रे सुरु करणार : मंगलप्रभात लोढा

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • आमदार रोहित पाटील-मंगल प्रभात लोढा यांची भेट
  • पी.पी.पी. मॉडेल द्वारे युवकांना व्यवसायिक शिक्षण मिळणार

सांगली/तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातील दोन्ही तालुक्यामध्ये लवकरच कौशल्य केंद्रे सुरु करण्याची ग्वाही राज्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविण्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी दिली असल्याची माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात कौशल्य केंद्र सुरू व्हावीत या मागणीसाठी आमदार रोहित पाटील यांनी शुक्रवारी मुंबईत नामदार मंगलप्रभात यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान श्री. लोढा म्हणाले, सार्वजनिक – खाजगी भागीदारी (PPP) मॉडेलद्वारे कौशल्य विकासासाठी खाजगी क्षेत्रातील उपक्रमांना बळ देणे, समर्थन देणे आणि समन्वय साधणे यासाठी तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यात व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांची लवकरंच उभारणी होईल.
आमदार रोहित पाटील म्हणाले, ‘पीपीपी’ माध्यमातून खाजगी क्षेत्राकडून लक्षणीय ऑपरेशनल आणि आर्थिक सहभागासाठी प्रयत्न करणे. विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणे. सेवा, उत्पादन, कृषी व संलग्न सेवा यासाठी चालना मिळणार आहे. सरकारने उच्च प्राधान्य क्षेत्रे आणि मेक इन इंडिया उपक्रमांच्या अंतर्गत २५ क्षेत्रांचा समावेश करण्यात आलेला आहे. यासाठी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया (NSDC) ही एक प्रकारची सार्वजनिक खाजगी भागीदारी कंपनी म्हणून स्थापन करण्यात आलेली आहे.
लवकरच तासगाव आणि कवठेमहांकाळ कौशल्य विकास केंद्रे सुरु करण्यासाठी योग्य आणि आवश्यक कार्यवाही करा असे निर्देश यावेळी मंगलप्रभात लोढा यांनी अधिका-यांना दिले. याशिवाय तासगाव आणि कवठेमहांकाळ येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना अपग्रेड करण्याची ग्वाही नामदार मंगलप्रभात लोढा यांनी दिली असल्याची माहिती आमदार रोहित आर आर पाटील यांनी दिली. बेरोजगारी ही माझ्या तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघातील सर्वात मोठी समस्या आहे. यावर मात करण्यासाठी योगेवाडी-मणेराजुरी मिनी एमआयडीसीचे काम लवकरच सुरु होणार आहे. याशिवाय कौशल्य विकास केंद्रे सुरु झाल्यानंतर मतदारसंघातील विद्यार्थ्यांना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर संधी देणार आहे. असेही आमदार रोहित पाटील यांनी सांगितले.

Leave a Comment

और पढ़ें