Search
Close this search box.

रखडलेले नवीन बाजार समितीचे काम पूर्ण करा : महादेव पाटील 

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  •  निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीने केलेल्या विविध घोषणांवर टीका  
  • नाव न घेता राष्ट्रवादीच्या ‘ दादांना ‘ केले लक्ष

सांगली /तासगाव : दहा वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक डोळ्या समोर ठेऊन नवीन बाजार समितीचे भूमिपूजन करण्यात आले होते. मात्र या बांधकामात कोट्यावधींचा भ्रष्टाचार होऊन ते काम बंद पडले. सहा महिन्यात नवीन बाजार समिती सुरू करण्याचे आश्वासन राष्ट्रवादीने (श.प. गट) बाजार समिती निवडणुकीत दिले होते त्याचे काय झाले? असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीकडून निवडणुकीच्या वेळी लोकप्रिय घोषणा करून लोकांना फसवले जात असल्याचा आरोप तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि तासगाव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष महादेव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

यावेळी बोलताना श्री. पाटील म्हणाले, सध्या सगळ्यांनाच विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत. निवडणुका जवळ आल्या की रेटून खोटं बोलायचा उद्योग तालुक्यातल्या काही मंडळींकडून सुरू असतो. सध्या दोन्ही तालुक्यात तरुणांना उद्योग देण्यासंदर्भातल्या गोष्टींचे पोस्टर लावले जात आहेत. भविष्यात रोजगार निर्मिती संदर्भात खोटी आश्वासने दिली जात आहेत. मात्र तासगाव तालुक्यातील मुख्य व्यवसाय असणाऱ्या बेदाणा उद्योगालाच अडचणीत आणण्याचा उद्योग तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते करत आहेत. दहा वर्षांपूर्वी त्यावेळच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोठा गाजावाजा करून तासगाव सांगली रस्त्यावरील शेड फार्मा या कृषी विभागाच्या जागेत भव्य दिव्य जागतिक दर्जाचे बाजार समिती उभारण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. मोठा कार्यक्रम घेऊन त्याचे भूमिपूजन ही करण्यात आले.

मात्र दहा वर्षानंतर नवीन बाजार समितीची परिस्थिती काय आहे आहे हे एकदा राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर करावे. या नवीन इमारतीसाठी तासगाव बाजार समितीचे कोट्यावधी रुपये स्वाहा करण्यात आले . राष्ट्रवादीच्या नेत्यांनी तिथे असणाऱ्या ठेकेदाराला हाताशी धरून बाजार समितीचे कोट्यवधी रुपयांची नुकसान केले. हे आम्ही म्हणत नसून शासनाने तीन-तीन वेळेला नेमलेल्या समितीने मान्य केले आहे. लेखापरीक्षकांनी याच्यावर फौजदारी करण्याची मागणी केली आहे ।

आज नवीन बाजार समिती आवारात कोट्यावधी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या इमारती या अक्षरशः भग्न अवस्थेत आहेत. कोट्यावधी रुपये पाण्यात गेले आहेत . नुकत्याच पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटले होते की, एका वर्षाच्या आत संबंधित बांधकाम पूर्ण करून नवीन मार्केट पूर्ण केले जाईल असे आश्वासन दिले होते. त्याला दीड वर्ष झाले. मात्र त्यात कोणतीही प्रगती झाली नाही.

निवडणूकीच्या तोंडावर नवनवीन लोकप्रिय घोषणा करून तरुणांना बेरोजगारांना फसवण्यापेक्षा तालुक्याच्या अर्थकारणाची नाडी असणाऱ्या बेदाणा मार्केटला उर्जित अवस्था आणण्यासाठी तात्काळ नवीन बेदाणा मार्केटचे काम पूर्ण करावे . कृषी विभागाच्या जागेत व्यवसायिक पेट्रोल पंप तसेच शॉपिंग मॉल सुरू करून बाजार समितीचे उत्पन्न तात्काळ वाढवणे शक्य आहे त्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न करावेत अशी भूमिका कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावचे संचालक आणि तालुका काँग्रेस अध्यक्ष महादेवनाना पाटील यांनी घेतली आहे.

Leave a Comment

और पढ़ें