Search
Close this search box.

अभिमान विरहित अवस्था येण्यासाठी विद्येचे व्यसन जडणे आवश्यक – प.पू .परमात्मराज महाराज

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

सांगली/तासगाव : माणसाने शेवट पर्यंत विद्यार्थी अवस्थेत राहायला हवे. अभिमान विरहित अवस्था येण्यासाठी विद्येचे व्यसन जडणे आवश्यक आहे. सद्ग्रंथांच्या अध्ययनाने जीवन मंगलमय व्हावे, असे प्रतिपादन प.पू . परमात्मराज महाराज यांनी केले. ते आडी (ता. निपाणी ) येथील संजीवनगिरी वरील श्री क्षेत्र दत्त देवस्थान मठाच्या वतीने गुरुपौर्णिमेच्या निमिताने सर्वेज्य सांस्कृतिक भवनात आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी सकाळी श्रीदत्तगुरूंच्या चरण चिन्हांवर अभिषेक अर्पण करून महाआरती करण्यात आली. त्यानंतर सदगुरू परमाब्धिकार प. पू. परमात्मराज महाराज यांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम झाला. यावेळी वैश्विक मंत्राचा जप करयात आला. प.पू. देवीदास महाराज व आश्रमस्थ साधू यांच्या हस्ते सद्गुरूंची पाद्यपूजा करण्यात आली. यावेळी अविनाश जोशी, दिगंबर जोशी यांनी षोडशोपचार पूजेचे पौरोहित्य केले.
रात्री साडेसात वाजता नामजपा नंतर प .पू. परमात्मराज महाराजांनी लिहिलेल्या नूतन शिप्रोत ग्रंथाचा प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी प .पू .परमात्मराज महाराज यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन झाले. ग्रंथाची प्रत प. पू. देवीदास महाराज, माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील यांना देऊन प्रकाशन सोहळा संपन्न झाला. यावेळी प्रवचनात बोलतांना प.पू . परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, पावसाला न जुमानता दिवसभर भाविकांनी गर्दी केली होती. शिप्रोत ग्रंथाच्या प्रकाशन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. भवबंधनाच्या विरोधात लढणारे सर्व भाविक वीरच आहेत. परिपूर्ण मांगल्याने ओतप्रोत असा ग्रंथ आहे. जगात अमंगलता वाढली आहे. लोकांच्या जीवनात मंगलमय घडावे यासाठी हा शिप्रोत ग्रंथ आहे. मानवी जीवनाचे अतीव मूल्य समजून घेण्यासाठी या ग्रंथाचे वाचन आवश्यक आहे. ज्ञानधनरूपी भांडवल या ग्रंथात आहे. आजचा दिवस ज्ञान पर्वरूपी आहे. जगताला ज्ञान दिलेल्या साधुसंत, गुरुवर्य, महापुरुषांच्या विषयी आदर व्यक्त करणारी, ज्ञानदात्यांचा सन्मान करणारी ही गुरुपौर्णिमा आहे. शिप्रोत ग्रंथामध्ये सर्वजातिधर्मसंप्रदायांना मान्य विचारांचे सम्मेलन आहे. आजच्या दिवशी व्यासांचा अविर्भाव झाला. व्यासांना विद्येचे व्यसन होते. भलतेसलते व्यसन करणाऱ्यांचा नावलौकिक होत नसतो. ज्ञानार्जनाचे व्यसन व्यासांना होते म्हणून त्यांच्या गुरुपदाचा नावलौकिक आहे. शास्त्राच्या अभ्यासाशिवाय चांगल्या वाईटाची जाणीव होणार नाही.विविध संप्रदायांचे लोक त्या त्या संप्रदायाचे वाङ्मय वाचतात. आपले वाङ्मय सर्व सांप्रदायिकांनी, सर्व धर्मियांनी वाचावे असे आहे, सद्ग्रंथाच्या वाचनाने माणसाची इज्जत वाढते. सद्ग्रंथ वाचनाचे व्यसन असावे. अध्यात्माच्या आनंदात झिंगण्याची नशा चांगली आहे. दारूच्या व्यसनाने जगभरात वर्षाकाठी 20 ते 25 लाख लोक मरतात. धूम्रपानाने दरवर्षी 80 लाख लोक जगभरात मरतात. सद्ग्रंथ वाचनानद्वारे ज्ञानामृत प्यावे. अनावश्यक मोबाईल च्या वापराने डिप्रेशन, मानसिक आजार आदीचे प्रमाण वाढले आहे. म्हणून सद्ग्रंथवाचनाचे चांगले व्यसन जोपासावे. आध्यात्मिक जीवनासाठी आवश्यक गोष्टी जाणून घ्याव्यात. ज्येष्ठ नागरिकांनी दुर्व्यसनांपासून अलिप्त राहून चांगले वागले पाहिजे तेव्हाच मुलांना सांगण्याचा नैसर्गिक अधिकार राहात असतो. विविध संप्रदायामध्ये आणि वेगवेगळ्या धर्मांमध्ये उपासनेच्या पद्धती वेगळ्या आहे. सर्वधर्म सत्याचरण करावयासच सांगतात. दैत्यही साधना करीत होते. त्यांच्या साधनेला महत्व राहत नाही. सर्वधर्मांमध्ये सदाचरणाला महत्त्व आहे. माणसाने माणूस बनून साधना करावी. एकत्वाने जगाचा उद्धार होणार आहे. भेदाने जगात संघर्ष होत आहेत. सत्य व अभेद ज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. विभ्रम भरपूर पसरलेला आहे. निःपक्षपाती भावनेने लिहिलेले वाङ्मय वाचणे आवश्यक आहे. परमाब्धितील विचार चांगले समजण्यासाठी शिप्रोत हा ग्रंथही आता भाविकांना उपलब्ध झालेला आहे. संकुचित विचार पसरविणाऱ्या जगात अनेक संस्था आहेत. माणसे शांतीच्या शोधात आहेत पण शांती मिळत नाही आहे. कारण सत्य ज्ञानाचा अभाव आहे. योग्य ध्येयाशिवाय ध्यान उपयोगाचे नाही. सद्‌विचार डोक्यात असतील तरच ध्येय कळेल. ध्येयामुळे ध्यान साधना घडेल. ज्ञानासह भक्ती, ज्ञानासह योग, ज्ञानासह कर्म, असणे महत्वाचे आहे. वाचनाशिवाय आरंभिक ज्ञान मिळत नाही. काही वेळेला दैवी हस्तक्षेपामुळे ज्ञान मिळते. पण सर्व सामान्यांना ज्ञानासाठी अध्ययन करणे आवश्यक आहे. वेदाच्या आधी कोणतेही वाङ्मय नव्हते. वेद स्वरूप, वेदमान्य सत्यज्ञान समजून घेण्यासाठी परमाब्धि सह वर्तेट, महोन्नय, शिप्रोत इत्यादी ग्रथांचे वाचन करीत रहावे,असे सांगितले.
यावेळी म्हाकवे भाविक भक्तांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी वीरकुमार पाटील, उद्योगपती एस.टी पाटील, सुखदेव साळुंखे, पी आर मोरे, अनिल जाधव कोल्हापूर, अरुण खोत पुणे, अमोल गळतगे गजबरवाडी, मल्लेश कुंभार आडी, बाळसो करडे कुन्नूर, ज्ञानराज माळी रेंदाळ, प्रसन्न कुमार गुजर निपाणी, आदी मान्यवर, देणगीदारांचा प.पू. परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. मा. राजे समरजितसिंह घाटगे, मा. आम. काकासो पाटील, निपाणी भागाचे युवानेते उत्तम अण्णा पाटील बोरगांवकर यांनीही भेट दिली.
यावेळी अतिशय पावसाच्या वातावरणातही आडी, बेनाडी, कोगनोळी, हणबरवाडी, हंचिनाळ, सुळकूड, म्हाकवे, आणूर, कागल, निपाणी पंचक्रोशीसह बेळगांव, बेंगलोर, कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, सोलापूर, सिंधुदुर्ग,सातारा, छ.संभाजीनगर जिल्ह्यांमधील अनेक लोक आले होते. कर्नाटक, महाराष्ट्र, गोवा राज्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी प्रवचन आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. “शिप्रोत ” ग्रंथाच्या पहिल्या आवृत्तीच्या सगळ्या प्रती ग्रंथ प्रकाशनाच्या पहिल्याच दिवशी भाविकांनी घेतल्या. भाविकांनी ग्रंथाला दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल सर्व भाविकांचे हार्दिक आभार व्यक्त करण्यात आले. दुसऱ्या आवृत्तीचे ग्रंथ लवकरात लवकर आणण्याचा प्रयत्न केला जाईल, असेही सांगण्यात आले.

Leave a Comment

और पढ़ें