हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक कडेगाव मोहरमची जय्यत तयारी
ताबूत बांधकामास गती : १७जुलै रोजी होणार गगनचुंबी ताबूतांचा भेटी सोहळा
सांगली रिपोर्टर हेमंत व्यास.
जातीय तणाव दंगली यामुळे सर्वत्र अस्थिर वातावरण असताना देशातील हिंदू मुस्लीम बांधवाना एकत्र आणण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. त्यास म्हणावे असे यश आले नाही. पण सुमारे 150 वर्षापूर्वी हिंदू मुस्लीम ऐक्य साधून तीच परंपरा जोपासण्याचा अभिनव प्रयोग आपणास पहावयाला मिळतो तो सांगली जिल्ह्यातील कडेगाव येथील मोहरमच्या सणात. हिंदु- मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून कडेगांव येथील मोहरम आणि गगनचुंबी ताबूत संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. त्यादृष्टीने कडेगावात मोहरमची जय्यत तयारी सुरू झाली असून गतीने ताबूत बांधकाम सुरू झाले आहे.
सांगली जिल्ह्यातील कडेगाव तालुका कराड –विटा मार्गावरील अंदाजे पंधरा ते वीस हजार लोकवस्ती असलेले एक गाव.या गावानेच मोहरमच्या निमित्ताने हिंदू-मुस्लीम ऐक्य घडवून जनतेसमोर आदर्श निर्माण केला.गगनचुंबी ताबुतांचा उत्सव साजरा करणारे कडेगाव संपूर्ण देशात प्रसिद्ध आहे.
येथील मोहरमचा इतिहास वेगळा आहे.येथील मोहरम ब्राम्हणसमाजातील संस्थानिक श्रीमंत भाऊसाहेब देशपांडे यांनी सुरु केला.तर मोहरमनिमित्त काव्यरचना करीत हिंदू-मुस्लिम ऐक्य घडवण्याचे काम थोर संत सय्यदपीर साहेब हुसेन पिरजादे यांनी केले.सन 1885 पासून येथे उंच ताबूत बसवण्यात येतात.येथील संस्थानिक भाऊसाहेब देशपांडे यांचा कराड येथील मोहरम सनात त्यांचा अपमान झाला.त्यानंतर त्यांनी आपण कडेगाव येथे कराडपेक्षाहि उंच ताबुतांची यात्रा भरवू, असा निश्चय केला.आणि कडेगाव येथे उंच ताबूत करण्यास प्रारंभ केला.त्यासाठी लोकांना प्रोत्साहन दिले.घरे जमिनी दिल्या.तेव्हा पासून मोहरमला वेगळी दिशा प्राप्त झाली.
बकरी ईदनंतर ताबुतांच्या बांधणीला सुरुवात झाली आहे.प्रतिपदेच्या चंद्र पाहून कुदळ मारली जाते. हिंदू-मुस्लीम बांधव खांद्याला खांदा लावून ताबुतांची बांधणी करतात.या ताबुतांची बांधणी वैशिष्टपूर्ण असते.आधी कळस मग पाया यानुसार त्यांची बांधणी केली जाते. मोहरम निमित्त येथे चौदा ताबूत बसविले जातात.त्यापैकी निम्मे हिंदूचे असतात.गावचे सर्व मुस्लीम बांधव हिंदू बांधवांच्या सनात व हिंदू बांधव मुस्लिमांच्या सर्व सनात परंपरे नुसार एकमेकाना मानपान दिला जातो.
ताबुतांची उंची सुमारे 110 ते 135 फुटापर्यंत असते.बांधकाम कळकाच्या (बांबूच्या),चिकन मातीच्या सहाय्याने सुतातून केले जाते.ताबूत बांधताना कुठेही गाठ दिली जात नाही हे याचे खास वैशिष्ठे मानले जाते.संपूर्ण ताबुतांचे अष्टकोणी मजले तयार केले जातात. वास्तूशास्त्राच्या आधारावर बांधकाम केले जाते.ताबुतांचे बांधकामपूर्ण झाल्यावर त्यावर रंगीत आकर्षक कागद लावले जातात.विद्युत आकर्षक रोषणाई केली जाते.ताबुतांची उभारणी उर्दू मोहरम महिन्याच्या 9 तारखेला होणार असून भेटी नयनरम्य सोहळा मोहरमच्या 10 तारखेला म्हणजे बुधवार दि. १७ जुलै रोजी होणार आहे.