Search
Close this search box.

चंद्रकांत सूर्यवंशी यांनी संस्थेच्या हिताच्या दृष्टीने कठोर पावले उचलली : सुनील पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काले

चंद्रकांत सूर्यवंशी यांचा सेवानिवृत्ती समारंभ संपन्न

सांगली/तासगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती तासगाव साठी सचिव म्हणून कार्यरत असताना प्रामाणिकपणे केलेले काम, संस्थेविषयी असणारी त्यांची निष्ठा, तळमळ आणि काही बाबतीत संस्थेच्या हिताच्या दृष्टीने उचललेली कठोर पावले यामुळे बाजार समितीची सुस्थिती व आर्थिक दृष्ट्या सक्षम अवस्थेत असणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव संस्था म्हणून नावारूपास येण्यात भर पडली. बेदाणा मार्केट जास्तीत जास्त वाढीच्या दृष्टीने त्यांनी केलेले प्रयत्न, शेतकरी व व्यापारी यांच्या प्रश्नावर चर्चा करून त्यांना दिलेला न्याय आणि संस्थेच्या कामकाजाबाबत वरिष्ठ कार्यालयात केलेले पाठपुरावे हे वाखाणण्या जोगे असल्याचे प्रतिपादन कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावचे सभापती युवराजदादा उर्फ सुनिल भानुदास पाटील यांनी केले. सेवानिवृत्ती सत्कार समारंभात ते बोलत होते.
तासगावच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव चंद्रकांत हिंदुराव सूर्यवंशी यांचा सेवानिवृत्ती सत्कार 31 मे रोजी संपन्न झाला. सत्कारास उत्तर देताना श्री. सूर्यवंशी म्हणाले, बाजार समितीच्या जडणघडणीसाठी प्रामाणिकपणे कामकाज पाहिले. सेवेच्या प्रदीर्घ काळामध्ये अनेक लहान मोठ्या प्रसंगांना तोंड देत संस्थेचा नावलौकिक वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केल्याचा मला सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी संचालक खंडू उर्फ रामचंद्र विठ्ठल पवार, सहाय्यक सचिव चंद्रकांत कणसे यांनी आपली मनोगते व्यक्त केली. श्री सूर्यवंशी यांनी राज्यातील सर्व बाजार समिती कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने भविष्यात येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी अन्यायाविरुद्ध न्याय मिळवून दिल्याच्या प्रसंगाला यावेळी उजाळा देण्यात आला.
या कार्यक्रमास उपसभापती रामचंद्र जाधव, संचालक अनिल पाटील, रवींद्र पाटील, विठ्ठल पवार, अवधूत शिंदे, कुमार शेटे, महादेवनाना पाटील, सुरेश बेले, धनाजी पाटील, राजेंद्र पाखरे, अंकुश माळी, सुदाम माळी, सौ रेखा पाटील, सौ विजया पाटील तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें