Search
Close this search box.

आजी-आजोबांची खरी जीवनकाठी म्हणजे त्यांची प्रेमळ नातवंडे-सुरेश ठाकूर गुरुजी…!

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

सिंधुदुर्ग-विवेक परब

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आचरे मेळाव्यात सुरेश ठाकूर गुरुजी यांचे प्रबोधन

ज्येष्ठ नागरिक सेवा संघ (फेस्कॉन संलग्न) यांच्या मासिक सभेत सुरेश शामराव ठाकूर गुरुजी, अध्यक्ष साने गुरुजी कथामाला मालवण यांचे “आजी आजोबा आणि कथाकथन” या विषयावर मार्गदर्शन झाले.

मार्गदर्शन करताना ठाकूर गुरुजी म्हणाले, “आजी-आजोबांची खरी जीवनकाठी म्हणजे त्यांची प्रेमळ नातवंडे. मग ती स्वतःची असू दे; शेजारची असू दे किंवा मानलेली असू द्या; कथाकथनाने त्यांच्या सानिध्यात राहणे म्हणजे आपणही बालकांप्रमाणे स्वच्छंदी होणे. या ज्येष्ठ वयात गोष्टी, गप्पा, गाणी यांच्या सानिध्यातून जे ज्येष्ठ ६ ते १४ या गटातील मुलांच्या संपर्कात राहतात ते ज्येष्ठ इतर ज्येष्ठ व्यक्तींच्या तुलनेत अधिक निरोगी, स्वच्छंदी आयुष्य जगतात. असे दि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचेही मत आहे,” असे ते म्हणाले.

ज्येष्ठ व्यक्तींना कथाकथनाचे तंत्र आणि मंत्र समजावून देत असताना ठाकूर यांनी ६ ते १४ वयोगटातील मुलांना कथाकथन करण्यास योग्य कथांचे विविध प्रकार तसेच मुलांना कथाकथन करताना आजी-आजोबांनी कोणती कौशल्य प्राप्त केली पाहिजेत याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गीतकथा, तालकथा, प्राणीकथा, नीतिकथा, बोधकथा, चातुर्यकथा, सृष्टीकथा, पर्यावरण कथा, धर्मकथा, पौराणिक कथा, ऐतिहासिक कथा, संतकथा, पंतकथा, परिकथा, चरित्रकथा, विज्ञानकथा आदी अनेक कथांचे नमुने उदाहरणादाखल सादर केले.

आजी-आजोबांनी कथाकथन करताना कथेची योग्य निवड, नातवंडांचा कथेत घ्यावयाचा सहभाग म्हातारपणातील आत्मविश्वास आणि अभिनय आदी कौशल्यांवर ठाकूर गुरुजी यांनी मार्गदर्शन केले.

व्याख्यानाचा समारोप करताना ते म्हणाले, “ज्या आजी-आजोबांना मनोरंजक कथाकथन करता येत नाही, त्यांना स्वतःला आजी-आजोबा हे पद मिरवण्याचा बिलकुल अधिकार नाही. वयोपरत्वे देवांनी जेष्ठत्वाची दिलेले देणगी सर्व ज्येष्ठांनी सार्थकी लावावी आणि कथाकथनाच्या माध्यमातून नातवंडांचा प्रेमळ सहवास सदैव अनुभवावा,” असे ते म्हणाले.

यावेळी अध्यक्षस्थानी अशोक कांबळी हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जकारीन फर्नांडिस यांनी तर आभार प्रदर्शन मनाली फाटक यांनी केले. यावेळी बाबाजी भिसळे, लक्ष्मण आचरेकर, प्रकाश पुजारे, सुरेश गावकर, भिकाजी रावजी कदम, सुप्रिया सकपाळ, सुरेंद्र सकपाळ आदींसह बहुसंख्य ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें