प्रतिनिधी – अतुल काळे
- जोरदार शक्तिप्रदर्शन करत संजयकाका पाटील यांचा उमेदवारी अर्ज दाखल
- रोहित पाटीलला एका व्यासपीठावर येण्याचे आव्हान
सांगली/तासगाव : तासगाव – कवठेमहांकाळ मतदार संघाची वाईट अवस्था आहे. इथल्या रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. सूतगिरणी बंद आहे. बाजार समितीची चौकशी सुरू आहे. तरुणांच्या हाताला रोजगार नाही. मतदारसंघात एकही संस्था उभी नाही. संस्था उभ्या केल्या नाहीत तर लोकांच्या हाताला काम कसे मिळणार ? या ठिकाणी केवळ भाषणं करून लोकांचं पोट भरणार नाही तर नेतृत्वात धमक असावी लागते, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पाटलांवर केला. शिवाय सिंचन घोटाळ्याच्या तथाकथित प्रकरणात आर. आर. पाटील यांनी माझा केसाने गळा कापला. त्यांनीच माझी ‘ओपन इंक्वायरी’ सुरू करण्याचा फाईलवर सही केली, असाही घणाघाती आरोप पवार यांनी यावेळी केला.
तासगाव – कवठेमहांकाळचे महायुतीचे उमेदवार, माजी खासदार संजय पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर तासगाव शहरातून पदयात्रा व जाहीर सभा घेऊन मोठे शक्तीप्रदर्शन करण्यात आले. यावेळी संजय पाटील यांनी रोहित पाटील यांना एका व्यासपीठावर येण्याचे खुले आव्हान दिले. सभेस आमदार इद्रिस नायकवडी, अजितराव घोरपडे, दीपक शिंदे, शेखर इनामदार, दिग्विजय सूर्यवंशी, ज्योती पाटील, राजवर्धन घोरपडे, प्रभाकर पाटील, पांडुरंग पाटील उपस्थित होते.
यावेळी अजित पवार म्हणाले, आर. आर. पाटील यांना अनेक वर्षे मंत्रीपदे मिळाली. त्यांना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री केलं. त्यांना आम्ही प्रचंड मदत केली. आधार दिला. मात्र मुंबई हल्ल्यावेळी त्यांनी एक स्टेटमेंट केले होते. त्यावेळी त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. पण, त्यांना मी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष केले. दरम्यान, माझ्यावर ज्यावेळी सिंचन घोटाळ्याचा आरोप झाला, त्यावेळी याच आर. आर. पाटील यांनी माझी ‘ओपन इंक्वायरी’ लावण्यासंदर्भात फाईलवर सही केली होती. माझा केसाने गळा कापला.
राज्यात महायुतीचं सरकार येणार आहे. त्यामुळे तासगाव – कवठेमहांकाळ मतदारसंघातही महायुतीच्या विचाराचा आमदार व्हायला हवा. शेतकरी, कष्टकरी, मायमाऊलींसाठी आम्हाला काम करायचे आहे. या मतदारसंघात केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून विकास कामे करायची आहेत. संजय पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघात विकास कामांचा शुभारंभ करायचा आहे. पाटील यांना 10 वर्षाच्या खासदारकीमुळे प्रशासनाचा दांडगा अनुभव आहे. हा अनुभव मतदार संघाच्या विकासासाठी कामी येईल.
ते म्हणाले, मी आणि आर. आर. पाटील एकाचवेळी आमदार झालो. पण, आज तासगावची काय अवस्था आहे? बारामतीला एकदा येऊन बघा विकास काय असतो. तासगाव बसस्थानकाची अवस्था बघवत नाही. आमच्या बारामतीचे बसस्थानक येऊन जरा बघा. त्यासाठी नेतृत्वात धमक असावी लागते. नुसतं भाषणं करून पोट भरणार नाही. भाषणं करून मुला-मुलींना रोजगार मिळणार नाही. इतकी वर्षे गृहमंत्री असताना व प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली असताना तासगावचा विकास का झाला नाही, असा सवाल त्यांनी केला.
लोकसभा निवडणुकीवेळी अजितराव घोरपडे व संजय पाटील एकत्रित नव्हते. ते वेगवेगळे होते. मात्र आता या निवडणुकीसाठी मी दोघांना एकत्रित आणले आहे. दोघांनीही आता ताकतीने काम करावे. दरम्यान, तासगावच्या न झालेल्या विकासाबाबतीत टीका करताना पवार म्हणाले, आज तासगावच्या सूतगिरणीची काय अवस्था आहे. ऐकून वेदना होतात. शेजारील पलूस, सांगोला तालुक्यातील सूतगिरण्या चांगल्या चालू आहेत. त्यासाठी माणूस कर्तुत्वान असावा लागतो.
संस्था चालवणे लेच्या – पेच्या माणसाचे काम नाही. तासगावचा खरेदी विक्री संघ, किसान नागरी पतसंस्था या संस्थांचीही अवस्था वाईट आहे. विस्तारित बेदाणा मार्केटचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. बाजार समितीमध्ये गोंधळाची परिस्थिती आहे. या बाजार समितीची सहकार आणि पणन विभागाकडून चौकशी सुरू आहे.
मी इथल्या आमदारांना माझ्यासोबत येण्याचे आवाहन केले होते. मात्र त्या माझ्यासोबत आल्या नाहीत. जे – जे आमदार माझ्यासोबत आले, त्यांच्या मतदारसंघात गेल्या दोन अडीच वर्षात 1500 ते 2000 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. इथल्या आमदार माझ्यासोबत आल्या असत्या तर इथेही विकास झाला असता.
ते म्हणाले, महाविकास आघाडीच्या लोकांनी लोकसभा निवडणूकीवेळी आम्ही संविधान बदलणार. घटना बदलणार, अशा अफवा पसरवल्या होत्या. मात्र सूर्य, चंद्र आहे तोपर्यंत कोणीही संविधानाला हात लावू शकत नाही. पण, महाविकास आघाडीच्या लोकांनी आमच्या विरोधात ‘फेक नरेटीव’ तयार केला होता. त्यामुळे दुर्दैवाने अल्पसंख्यांक समाजाची मते आमच्यापासून दूर गेली. पण, आमच्या सरकारने प्रचंड काम केले आहे. अल्पसंख्यांक समाजासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिला आहे. सुमारे 44 लाख शेतकऱ्यांना 14 हजार कोटी रुपयांची वीज माफी दिली आहे. त्यांची वीज बिले झिरो केली आहेत.
सुमारे 2 कोटी 30 लाख महिलांना लाडकी बहीण योजनेद्वारे पैसे दिले आहेत. आम्ही आर्थिक नियोजन केले आहे. त्यामुळे सुरू केलेली कुठलीही योजना बंद पडणार नाही. आमचे सरकार आल्यास सर्व योजना सुरळीतपणे चालू राहतील. पुढील पाच वर्षासाठी शेतकऱ्यांचे वीज बिल झिरो असेल, असेही ते म्हणाले.
माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे म्हणाले, लोकसभा निवडणुक वेळी काही विचार दूषित वातावरणामुळे बदलावे लागले होते. पण आता संजय पाटील यांच्या पाठीशी कवठेमहांकाळ तालुका खंबीरपणे उभा आहे. कोणीही शंका बाळगू नये. यावेळी बदल करणे गरजेचे आहे. तशी वेळ आणि परिस्थिती आली आहे. गेली 35 वर्षे थापा मारणाऱ्याला पुन्हा संधी द्यायची नाही.
महायुतीचे उमेदवार संजय पाटील म्हणाले, या तालुक्यात 35 वर्षे तरुणांच्या भविष्याची खेळण्याचे काम आर. आर. पाटील घराण्याने केले आहे. अजित पवार यांनी आर. आर. पाटील यांना उपमुख्यमंत्री, गृहमंत्री केले. त्यांच्या पाठीशी बळ उभे केले. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री असताना त्यांनी तालुक्यातील प्रश्न सोडवणे आवश्यक होते. ते त्यांनी केले नाही. केवळ टीव्ही आणि पेपरमधून स्वतःची लोकप्रियता वाढवण्याचे काम केले. माणसांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा स्वतःची प्रसिद्धी करण्यात त्यांचे आयुष्य गेले.
ते म्हणाले, मतदारसंघाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली नाही. बेरोजगारांच्या हाताला काम देतो म्हणून अनेक निवडणुका लढवल्या गेल्या. 1999 व 2004 मध्ये माझा निसटता पराभव झाला. त्यावेळी पोलीस खात्याचे बळ आर. आर. पाटील यांच्या पाठीशी होते. पोलिसांच्या माध्यमातून मतदारांना आणणाऱ्या गाड्या जप्त केल्या गेल्या. अनेकांना अटक केली गेली. मात्र ध्येयवेडी माणसं माझ्या पाठीशी ठाम राहिली. ही माणसंच माझं बळ आहे.
माझ्यावर सातत्याने गुंडगिरीचा आरोप केला जातो. मात्र आर. आर. पाटील यांच्याकडे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री पद होते. त्यांनी पोलीस व सरकारच्या माध्यमातून माझ्यावर दबाव आणून आघात करण्याचे काम केले. त्याचा मी प्रतिकार केला. कोणाच्याही दोन पैशाला हात लावला नाही. वाममार्गाने मिळवलेला पैसा कधीही टिकत नसतो. त्यामुळेच आज प्रचंड माणसं माझ्या पाठीशी ठामपणे उभी आहेत.
लोकसभेला जाती-धर्मांमध्ये अंतर वाढत गेले. अंतर्गत कुरघोड्याचे राजकारण झाले. त्यामुळे माझा पराभव झाला. त्यावेळी अजितराव घोरपडे माझ्यासोबत नव्हते. मात्र आता आम्ही दोघांनी एकत्रित बसून निर्णय घेतला आहे. शत्रूला हरवायचं असेल, तरुणांच्या भविष्याशी चाललेली चेष्टा थांबवायची असेल, भविष्य उध्वस्त होऊ द्यायचे नसेल तर एकत्रित यायला लागतंय, असा निर्णय आम्ही घेतला आहे. विरोधक प्रचंड खोटे बोलत आहेत. पाणी योजनांसाठी मी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी आणला. ताकारी, टेंभू, म्हैशाळ, आरफळ या योजना सुरू केल्या.
ते म्हणाले, आर. आर. पाटील यांच्या पश्चात आम्ही सुमन पाटील यांना मदत केली. त्यांना निवडून आणले. पण ज्यावेळी माझ्यावर प्रसंग आला त्यावेळी माझा गळा दाबायला सर्वात अगोदर अंजनीचे घर पुढे होते. त्यामुळे आता लोकांनी ठरवलं आहे की, कामाचा कोण आणि नौटंकी करणारा कोण आहे. जेवतानाही पुढे कॅमेरा लावून नुसती प्रसिद्धी करण्यात रोहित पाटील व्यस्त आहेत. ही कॅमेराजीवी माणसं आहेत. मतदारांनी मला एकदा आमदार करावे. इतिहासात नोंद होईल, एवढे पैसे आणून मतदारसंघाचा विकास केल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही. आता घोरपडेंची ताकद माझ्या पाठीशी आहे. त्यामुळे विजय निश्चित आहे. पण कोणीही गाफील राहू नये।
संजय पाटील यांना निवडून द्या, त्यांना मंत्री करतो. तर अजितराव घोरपडेंनाही विधिमंडळात घेतो : पवार
या निवडणुकीत संजय पाटील व अजितराव घोरपडे एकत्रित काम करत आहेत. अजितराव घोरपडे यांनी संजय पाटील यांना कवठेमहांकाळमधून मताधिक्य द्यावे। त्यांना मी विधिमंडळात घेणार, हा माझा शब्द आहे. तर तासगाव – कवठेमहांकाळकरांनी संजय पाटील यांना निवडून द्यावे. त्यांना मंत्रिपद दिले जाईल, अशी घोषणा यावेळी अजित पवार यांनी केली।