रिपोर्ट: अतुल काले
सांगली /तासगाव : तासगाव कवठेमंकाळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजयकाका पाटील दिनांक 29 ऑक्टोबर रोजी अर्ज दाखल करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजितदादा पवार हे उपस्थित राहणार आहेत.
तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघ हा अंजनी विरुद्ध चिंचणी अशा राजकीय विचारांचा लढवय्या ठरला आहे. आर.आर. आबा पाटील आणि संजयकाका पाटील हे या मतदारसंघात बरेच काळ एकमेकांचे विरोधक म्हणून नावारूपास आले. संजयकाकांचा राजकीय संघर्ष पाहता राष्ट्रवादीतून 2014 साली त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. स्वतःच्या ताकतीवर लोकसभा निवडणूक लढवीत भाजपचे खासदार म्हणून निवडून आले. त्यानंतर 2019 साली पुन्हा लोकसभा निवडणूक लढवत दुसऱ्यांदा निवडून आले. मात्र 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये विरोधकानी जिल्ह्यातून खेळलेल्या राजकीय खेळीमध्ये त्यांचा बळी गेला. लोकसभेमध्ये पराभवास सामोरे जावे लागले.
2024 च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान महायुतीतील तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ भाजपकडून अजितदादांच्या राष्ट्रवादीकडे राखीव ठेवला गेला. त्यामुळे नाईलाजास्तव काकांना राष्ट्रवादीची वाट धरावी लागली. असे त्यांच्या कार्यकर्त्यातून बोलले जात आहे. आता याच विधानसभा निवडणुकीसाठी संजयकाका पाटील सज्ज झाले आहेत. कवठेमहांकाळ येथील अजितराव घोरपडे सरकार यांच्या मदतीने जुन्या विरोधकाचे सुपुत्र रोहित पाटील यांच्याशी त्यांची राजकीय लढाई सुरू झाली आहे. घड्याळ विरुद्ध तुतारी अशी विधानसभेची निवडणूक लढली जाणार आहे. याच निवडणूक उमेदवारीचा अर्ज भरण्यासाठी मंगळवार दि. 29 रोजी अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत संजयकाका पाटील तासगाव येथे अर्ज भरणार आहेत.