प्रतिनिधी – अतुल काळे
- विरोधकांवर विश्वासघाताचा आरोप
- प्रभाकर पाटील यांची विधानसभेची उमेदवारी जाहीर
सांगली/तासगाव : विकासापेक्षा जातीपातीच्या राजकारणाने अडचण निर्माण झाली. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाने खचून जाणारा संजय पाटील नाही. शिकार करायची असेल तर दोन पावलं यावं लागतं, ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी अडचणीच्या काळात आपला विश्वासघात केला. आणखी अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. प्रभाकर तुमच्यासाठी काम करतोय. दोन महिन्यात येणारी विधानसभा निवडणूक आपणाला जिंकायची आहे असे आवाहन माजी खासदार संजयकाका पाटील यांनी केले. तासगाव येथे प्रभाकरबाबा पाटील युवाशक्ती आयोजित प्रभोदय दहीहंडी महोत्सवात ते बोलत होते. या दहीहंडी च्या निमित्ताने प्रभाकर पाटील यांची विधानसभा निवडणुकीसाठीची उमेदवारी जाहीर झाली असून रोहित पाटील यांना विरोधक उमेदवार म्हणून प्रभाकर पाटील यांचे आव्हान असल्याचे स्पष्ट झाले आहे.
तासगाव तालुक्यातील गोविंदा पथके जिल्ह्याबाहेर नावलौकिक करत असताना त्यांना प्रोत्साहन म्हणून दहीहंडीचे आयोजन संयोजकांकडून करण्यात आले होते. ही दहीहंडी फोडण्याचा मानकरी तासगावचे शिवनेरी गोविंदा पथक ठरले. या दहीहंडी उत्सवादरम्यान लेजर शो, पेपर ब्लास्ट, डान्स शो चे आयोजन करण्यात आले होते. लोकप्रिय गाण्यावर कालाकरांसह तरुण मंडळीही उत्साहात थिरकली.
यावेळी बोलताना संजयकाका पाटील यांनी नाव न घेता स्वर्गीय आर.आर.आबा पाटील यांच्या कुटुंबीयांवर विश्वासघाताचा आरोप करत तोफ डागली. संजयकाका म्हणाले, विकासापेक्षा जातीपातीच्या राजकारणाने अडचण निर्माण झाली. ज्यांना आपण सहकार्य केलं त्या मंडळींनी आपला विश्वासघात केला. अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला. काही माणसांना बोलायची सवय आहे. एक हात लाकूड दहा हात ढलपी. तसा प्रयोग तालुक्यामध्ये आपण पाहतोय. अशा शब्दात विरोधकांचा समाचार घेतला.
यावेळी बोलताना प्रभाकर पाटील म्हणाले, वाईट काळ आला तर मी निश्चित आपल्या सोबत असेन. विकासासाठी अहोरात्र कष्ट करेन. आपली सेवा करण्यात मी कुठेही कमी पडणार नाही. तासगाव तालुक्याचा विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून कष्ट करेन. अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली