Search
Close this search box.

तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी – विक्रांत पाटील

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • वसंतरावदादा पाटील महाविद्यालयात राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसानिमित्त कार्यक्रम संपन्न

सांगली/तासगाव : देवाच्या अनुषंगाने पसरविलेल्या गोष्टी म्हणजेच अंधश्रद्धा. समाजात दिसणाऱ्या अशा अंधश्रद्धा बाजूला करा म्हणजे आपला वैज्ञानिक दृष्टिकोन तयार होईल. तरुणांनी वैज्ञानिक दृष्टिकोनाची जोपासना करावी असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते आणि व्याख्याते विक्रांत पाटील यांनी केले. पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील महाविद्यालय, तासगाव येथे अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष, विवेक वाहिनी (विवेक विचार कक्ष) आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती, तासगाव यांच्या सहयोगाने राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिवसानिमित्त ‘युवा संवाद: वैज्ञानिक स्वभाव जोपासना’ कार्यक्रमात ते बोलत होते.
विक्रांत पाटील पुढे म्हणाले, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांचे विचार समाजातील अंधश्रद्धा संपवू शकतात. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक ओळखता आला पाहिजे. ज्ञानाचा प्रकाश आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचला पाहिजे. डोळस वृत्ती जोपासून, का? हा एकच प्रश्न आपल्याला पडला पाहिजे. चौकस वृत्तीने प्रत्येक गोष्टीतील विज्ञान समजून घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे होते. यावेळी अंनिसच्या राज्य कार्यकारणी सदस्य सुजाता म्हेत्रे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ.नरेंद्र दाभोळकर यांच्या १५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक वाहिनीचे समन्वयक प्रा.रोहित लोंढे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय अंनिस,तासगावचे कार्याध्यक्ष अमर खोत यांनी केला, तर आभार डॉ.पवन बी.तेली यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभागप्रमुख प्रा.आण्णासाहेब बागल यांनी केले. या कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ.नरेंद्र कुलकर्णी,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.मेघा पाटील, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रो.डॉ.तातोबा बदामे,डॉ.नितीन गायकवाड, डॉ.के.एन.पाटील, डॉ. विलास साळुंखे,प्रा.प्रभाकर पाटील तसेच सर्व विद्याशाखेतील प्राध्यापक वृंद, प्रशासकीय वृंद, विद्यार्थी – विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

और पढ़ें