प्रतिनिधी – अतुल काळे
शिवसेनेकडून जिल्हाधिकाऱ्यांना लक्षवेधी निवेदन
सांगली/तासगाव : सांगली जिल्ह्यात गाईच्या दुधाला मिळणारा दर आणि त्या तुलनेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गाईच्या दुधाला मिळणारा दर यामध्ये मोठी तफावत असून गेली आठ नऊ महिने गाईच्या दुधाला दर कमी मिळत आहे. संपूर्ण देशात दुधाच्या गुणप्रतिवर दर दिला जात असताना सांगली जिल्ह्यातील सहकार व खाजगी दूध उत्पादक संघ यांचे दर कमी का ? असा सवाल करीत सदर प्रकरणावर लक्षवेधी निवेदन शिवसेनेचे तासगाव तालुकाप्रमुख (शिंदे गट) संजयदाजी चव्हाण यानी सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांना दिले आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, गेली आठ नऊ महिने गाईच्या दूध दरात सातत्याने घट होताना दिसत आहे. एकीकडे खाद्याचे दर वाढत आहेत व दुष्काळग्रस्त भागात चारा उपलब्ध नसल्याने बाहेरून 4000 ते 5000 रुपये टन असा चढ्या दराने चारा आणावा लागत आहे. काही खाजगी दूध संघ चालकानी गाईच्या दुधाला कमी दर देऊन शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. सरासरी गायीचे एक लिटर दूध उत्पादन करण्यासाठी 40 ते 42 रुपये खर्च होत असताना दुसरीकडे अतिरिक्त दुधाचा कांगावा करत जाणून बुजून दर पाडले आहेत.
सांगली जिल्ह्याजवळ असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यामधील गोकुळ, वारणा दूध संघ या खाजगी दूध संघानी शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन दूध उत्पादकांना ३.५ फॅट ८.५ एस एन एफ ला 6 रुपये जादाचा म्हणजे 33 रुपये दर गायीच्या दुधाला मिळत आहे. त्याचबरोबर शासन निर्णयानुसार पाच रुपये अनुदानही मिळवून दिले जात आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसायाकडे वळलेला आमचा सामान्य शेतकरी दैनंदिन खर्च भागवत असताना खाजगी दूध संघचालकानी दूध दरावर अंकुश आणला आहे. असं निर्णयानुसार गाईच्या प्रति लिटर दुधाला पाच रुपये अनुदान जाहीर असूनही गेल्या पाच महिन्यापासून आज अखेर जवळपास 70 ते 80 टक्के दूध उत्पादकांना अनुदान मिळाले नाही. दुधाला दर कमी मिळत असताना अनुदानाअभावी जनावरे कशी जगवायची हा गंभीर प्रश्न सांगलीतील, विशेषतः तासगाव तालुक्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना पडला आहे. गाईच्या दुधाला कर्नाटक राज्यामध्ये 35 ते 36 रुपये, गुजरात मध्ये 36 रुपये, हरियाणात 38 रुपये तर पंजाब मध्ये 40 रुपयाच्या जवळपास आहे. तर मग महाराष्ट्रातील गाईच्या दुधाला पाण्याच्या बाटलीचा दर का? असा संतप्त सवाल दूध उत्पादकांकडून विचारला जात आहे. इतर शेती पूरक व्यवसायातील ऊस, कापूस, सोयाबीन प्रमाणे हमीभाव मिळावा, दुधापासून उत्पादित केलेल्या पदार्थावर 70% – 30 % असा फॉर्मुला लागू करून मिळावा. अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील संघांप्रमाणे सांगलीच्या राजारामबापू संघानुसार सांगली जिल्ह्यातील तासगाव पूर्व भागातील दूध उत्पादकांना शासनाचे प्रतिनिधी म्हणून 40 दर मिळावा, अन्यथा दूध उत्पादकांच्या पाठीमागे शिवसैनिक खंबीरपणे उभे राहून तीव्र आंदोलन करणार असल्याचे शिवसेनेचे तासगाव तालुकाप्रमुख संजयदाजी चव्हाण यांनी सांगितले आहे. यावेळी संभाजी पाटील, सर्जेराव पाटील, दशरथ निकम, नागेश पाटील आदी उपस्थित होते.