Search
Close this search box.

रिंग रोड साठी चप्पल कोणी झिजवल्या ?

👇समाचार सुनने के लिए यहां क्लिक करें

प्रतिनिधी – अतुल काळे

  • आबा – काका गटात श्रेयवाद पेटणार !
  • जनतेमध्ये संभ्रम

सांगली/तासगाव : केंद्रीय मंत्र्यांच्या भाषणातील उल्लेखाने तासगाव – कवठेहांकाळ मतदार संघातील जनता अचंबित झाली असून नागरिकांमध्ये द्विधा मनस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये याचे काय पडसाद उमटणार याबाबत तर्कवितर्क सुरू असून रिंग रोडच्या मुद्द्यावरून आबा- काका गटात श्रेयवादाची रस्सीखेच निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
सांगली येथे एका कार्यक्रमादरम्यान भाजपचे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी विधान केले की, तासगाव शहराच्या बाह्य वळणा रस्त्याची मागणी बरेच दिवस सुरू होती. तिथल्या स्थानिक आमदारांनी वेळोवेळी याबाबत पाठपुरावा केला. 7 किलोमीटरच्या बाह्यवळण रस्त्यासाठी 173 कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. भूसंपादनाचे काम सुरू आहे. हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल. असे वक्तव्य श्री. गडकरी यांनी केले. गडकरींच्या या वक्तव्यामुळे तासगावकर जनता संभ्रमात पडली आहे.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघाच्या स्थानिक आमदार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (श.प.गट) सुमनताई आर. आर. आबा पाटील तर युवा नेते रोहितदादा आर. आर. आबा पाटील सक्रिय आहेत. तत्कालीन उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री आर.आर.आबा पाटील यांनी भविष्यात येणारी तासगाव शहरातील वाहतुकीची समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना म्हणून तासगाव शहर रिंग रोड चा आराखडा बनविला. त्यानंतर सांगलीहून भिलवडीकडे जाणारा (तासगाव शहर बायपास रस्ता) सुरू झाला. परंतु इतर बाजूने असणाऱ्या रिंग रोड भूसंपादन प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण झाला. शेतकऱ्यांनी वैयक्तिक आणि राजकीय कारणास्तव भूसंपादनास नकार दर्शविला. त्यामुळे तासगाव शहराच्या बाजूने होणारा रिंग रोड प्रलंबित पडला.
आर. आर. आबा पाटील यांच्या निधनानंतर त्यांचे राजकीय विरोधक असणारे संजयकाका पाटील यांनी प्रलंबित रिंग रोड पूर्णत्वाच्या दृष्टीने प्रयत्न केले. सांगली जिल्ह्याचे खासदार म्हणून संजयकाका यांचा 10 वर्षाचा कार्यकाल पूर्ण झाला. तासगावचा रिंग रोड प्रश्न अद्याप सुटला नव्हता. जुलै 2024 मध्ये संजयकाका पाटील यांनी शेतकऱ्यांसोबत संयुक्त बैठक पार पाडली. यावेळी प्रांत अधिकारी, तासगावचे तहसीलदार, भूमी अभिलेख उपअधीक्षक, सार्वजनिक बांधकाम अभियंता आणि शेतकरी उपस्थित होते. या चर्चेदरम्यान भूसंपादन प्रक्रिया पुढील एक महिन्यात पूर्ण होईल असे स्पष्ट करण्यात आले. या कामासाठी शासनाकडून 85 कोटी रुपये निधी मंजूर झाला असल्याचे माजी खासदार संजयकाका पाटील यांनी जाहीर केले. रिंग रोड मार्गाचे काम लवकरच मार्गी लागणार असल्याचेही स्पष्ट केले होते.
परंतु संजयकाका यांच्या संयुक्त बैठकी नंतर तिसऱ्याच महिन्यात सांगली येथे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांनी तासगाव शहराच्या 7 किमी बाह्यवळण रस्त्यासाठी 173 कोटी रुपये मंजूर झाले असून यासाठी स्थानिक आमदारांनी पाठपुरावा केला असल्याचे विधान केले. या विधानामुळे तासगावातील नागरिक द्विधा मनस्थिती मध्ये वावरत आहेत. रिंग रोड साठी प्रत्यक्षात कोणत्या राजकीय नेत्याने चप्पल झिजवल्या ? याबाबत संभ्रम निर्माण झाला असून आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आबा-काका गटात श्रेयवादाची रस्सीखेच सुरू होणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

Leave a Comment

और पढ़ें