प्रतिनिधी – अतुल काळे
- संजयकाकांची घड्याळाकडे धाव
- तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघास आश्चर्याचा धक्का
- प्रभाकरबाबांच्या उमेदवारी चर्चेस पूर्णविराम
सांगली /तासगाव : तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून राखीव असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (अजित पवार गट) अधिकृत उमेदवार म्हणून संजयकाका पाटील यांची उमेदवारी निश्चित झाली असून भाजपच्या कमळला टाटा करून राष्ट्रवादीच्या घड्याळाकडे धाव घेतल्याने अवघ्या तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघास आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजप कडून युवा नेते प्रभाकरबाबा पाटील हे विधानसभा निवडणूक लढवतील अशी चर्चा गेले अनेक काळ सुरू होती. या चर्चेस आता पूर्ण विराम लागला आहे.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघ याआधी आर.आर आबा. पाटील आणि संजयकाका यांच्यातील राजकीय संघर्षाचा साक्षीदार ठरला होता. आता स्वर्गीय आर. आर. आबा पाटील यांचे सुपुत्र रोहितदादा पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यात थेट लढत होणार आहे. हा सामना तुतारी विरुद्ध घड्याळ असा रंगणार आहे.
येत्या काळात ही लढत औत्सुख्याची ठरणार आहे.
घड्याळ ते घड्याळ व्हाया कमळ असा राजकीय प्रवास — संजयकाका पाटील यांचा गेल्या काही वर्षातील राजकीय प्रवास पाहता घड्याळ ते घड्याळ व्हाया कमळ असा झालेला दिसून येतो. आर. आर. आबांशी राजकीय संघर्ष असताना दोघात समेट घडून संजयकाका पाटील यांनी त्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची वाटचाल सुरू होती. 2014 साली भाजपकडून संजयकाकांना खासदारकीची संधी चालून आली. भाजपच्या कमळ चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवीत संजयकाका सलग दोन वेळा खासदार झाले. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना पराभवास सामोरे जावे लागले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत महायुती मधील भाजपच्या मित्रपक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कडे उमेदवारीची जागा राखीव राहिली. उमेदवारीची ही संधी पदरात पाडून घेताना संजयकाका पाटील यांनी अजितराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली वाटचाल सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाकडे धाव घेतली आहे. त्यामुळे संजयकाकांचा प्रवास घड्याळ ते घड्याळ व्हाया कमळ असा झालेला दिसून येत आहे.