प्रतिनिधी – अतुल काळे
- युतीकडून उमेदवारी लांबणीवर
- उमेदवार गुपित का ? : नागरिकात चर्चा
सांगली /तासगाव : 20 नोव्हेंबर रोजी मतदान असणाऱ्या विधानसभा निवडणूक 2024 साठी केवळ 30 दिवसाचा कालावधी शिल्लक राहिला असून प्रचारासाठी अल्प कालावधी असताना तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातून महायुतीचा उमेदवारच अद्याप जाहीर झाला नाही. महायुतीचा उमेदवार अद्याप गुपित का ? अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे.
तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघ हा महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच चर्चेमध्ये राहिला आहे. यापूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये आर. आर. आबा पाटील गटाकडून आणि संजयकाका पाटील गटाकडून अगोदरच उमेदवार ठरले जात होते. परंतु विधानसभा निवडणूक 2024 साठी केवळ 30 दिवस बाकी असताना महायुती कडून उमेदवार अद्याप ठरता ठरेना अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर तासगाव- कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघात भाजपला उमेदवारी मिळणार असे चित्र निर्माण झाले होते. परंतु विधानसभेचे वारे सुरू होऊन देखील भाजपकडून कोणत्याही हालचाली दिसून आल्या नाहीत. महायुतीमध्ये भाजपकडून तासगाव – कवठेमहांकाळ विधानसभेच्या जागेसाठी आग्रही भूमिकाही धरली गेली नाही. तर अनपेक्षितपणे हा मतदारसंघ अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे राखीव ठेवण्यात आला. मतदार संघातील नागरिकांना भाजपकडून उमेदवार मिळण्याची आशा असताना अचानकपणे ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेली. या मतदारसंघांमध्ये अजित पवार गटाच्या प्रबळ उमेदवार नसल्याने अद्याप उमेदवार चाचपणी सुरू आहे. दोन दिवसापूर्वीच या संदर्भात मुंबई येथे एक बैठक पार पडली. यावेळी तासगाव आणि कवठेमहांकाळ शहरातील दोन बडे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर कवठेमहांकाळ मधील एका राजकीय नेत्याच्या पाठबळावर महायुतीचा उमेदवार निश्चित होईल असे सांगण्यात आले. परंतु तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीकडून कोणता उमेदवार रिंगणात उतरणार यावर अद्याप प्रश्नचिन्हच आहे. केवळ चर्चेत राहण्यासाठी महायुती उमेदवाराबाबत चालढकलपणा करीत आहे का? एकत्र भेटीला गेलेल्या नेत्यांमध्ये अद्याप निर्णायक विचार झाला नाही का? का उमेदवारी बाबत अन्य कोणते कारण आहे? अशी चर्चा तासगाव-कवठेमहांकाळ मतदार संघातील नागरिकांमध्ये सुरू आहे.