प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावच्या संचालक मंडळाच्या कारभाराबाबत महाराष्ट्र राज्याचे कृषी व पणन मंत्री नाम.अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा झाली असल्याची माहिती निमणीचे माजी उपसरपंच आर.डी. (आप्पा) पाटील यांनी दिली.
याबाबत बोलताना श्री पाटील म्हणाले, कृषी उत्पन्न समितीचे विस्तारित बेदाणा मार्केटचे बांधकाम रखडले आहे. या बांधकामात अनियमयता दिसून आली आहे. तत्कालीन संचालक मंडळाची चौकशी व कामकाजाबाबत चौकशी अधिकारी यांनी अहवाल सादर केला आहे. शासकीय मूल्यांकनकाराने दिलेला अहवाल आणि त्या अनुषंगाने कारवाई करण्यात होणारी दिरंगाई याबाबतही चर्चा झाली. बेदाणा उत्पादकांच्या समस्या, विक्री झालेल्या बेदाण्याच्या रक्कमा उत्पादक शेतकऱ्यांना नियमाप्रमाणे ठरलेल्या वेळेत शेतकऱ्यांना मिळाव्यात तसेच द्राक्ष उत्पादकांची व्यापारी व दलालांकडून होणाऱ्या फसवणुकी बाबत शासनाने ठोस उपाय योजना करावी. अशा महत्त्वाच्या बाबींवर यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले, बाजार समिती कारभाराबद्दल विशेष लक्ष घालून लवकरात लवकर योग्य निर्णय घेतला जाईल.