प्रतिनिधी – अतुल काळे
सांगली/तासगाव : उज्ज्वल विचारांनी उज्ज्वल परमार्थ घडत असतो. अहोरात्र उज्ज्वल विचारच मनात चालू असले पाहिजेत. नेहमी चांगल्या विचारांनी वागा. मलीन विचारांना मनामध्ये ठेऊ नका, असे प्रतिपादन प.पू . परमात्मराज महाराज यांनी केले. आडी (ता. निपाणी) येथील संजीवनगिरी वरील श्री दत्त देवस्थान मठाच्या वतीने श्रावण पौर्णिमेच्या निमिताने आयोजित प्रवचन कार्यक्रमात ते बोलत होते.
सकाळी श्रीदत्त मंदिरात श्री दत्तगुरूंच्या चरण चिन्हांवर अभिषेक अर्पण करण्यात आला. असंख्य भाविकांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली. रात्री साडेसात वाजता सर्वेज्य सांस्कृतिक भवनात नामजपानंतर आयोजित प्रवचन कार्यक्रमात बोलतांना प. पू. परमात्मराज महाराज पुढे म्हणाले, रक्षाबंधन दिनाच्या दिवशी बहिणींच्या, छोट्या भावांच्या, वृद्धांच्या किंवा रक्षण करण्या योग्य अशा इतरही व्यक्तींच्या जीवन रक्षणाचा पवित्र संकल्प केला जातो. श्रावण सोमवार व पौर्णिमा एकाच दिवशी आल्याने शिवतीर्थ यात्रा व श्रीदतगुरूंच्या तीर्थस्थानांची यात्रा पुष्कळांकडून घडली. दिवसभर अनेक क्षेत्री जाऊन भाविक दत्त देवस्थान आडी येथे दर पौर्णिमेच्या मासिक यात्रेसाठीही आलेत, याबद्दल अत्यन्त वाटतो. प्रवचन कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी भाविक आले आहेत. ही आनंदाची बाब आहे. समुद्राला नारळ अर्पण करून नारळी पौर्णिमा साजरी केली जाते. त्याच प्रमाणे ज्ञान समुद्राला विश्वास रूपी नारळ अर्पण करायला हवा. हा उज्ज्वल संकल्प आहे. सणांचा उज्ज्वल आशय समजून घेणे चांगले कार्य आहे. सर्वदेवतांची रूपे उज्ज्वल आहेत, उज्ज्वलते कडे नेणारी आहेत म्हणूनच अनेक यात्रा भरत असतात.
यावेळी सुरज शंकरराव पाटील हुपरी यांच्या वतीने महाप्रसादाची सोय करण्यात आली होती. यावेळी संभाजी नगरचे माजी जि.प. अध्यक्ष आण्णासो शिंदे, हेमंत महाराज आळंदी, आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर झालेबदल रंगराव बन्ने बारवाड, शिरोळ साखर कारखाना उपाध्यक्षपदी निवडी बद्दल शरदचंद्र पाठक, अमोल गळतगे गजबरवाडी, सौ. सुचिता संकेश्वरे कोगनोळी, संग्राम पाटील तळंदगे, सुरेश कोळी, प्रथमेश गुरव आडी आदी देणगीदार तसेच मान्यवरांचा प. पू . परमात्मराज महाराज व देवीदास महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आडी, बेनाडी, हंचिनाळ, कोगनोळी पंचक्रोशीसह कोल्हापूर, बेळगांव, सांगली, सातारा, छ. संभाजीनगर, सोलापूर, बीड, पुणे, मुंबई, सिंधुदुर्ग इ. जिल्ह्यातील, कर्नाटक महाराष्ट्र व गोवा राज्यातील हजारो भाविकांनी प्रवचन व महाप्रसादाचा लाभ घेतला.