प्रतिनिधी -अतुल काळे
सांगली/तासगाव : तासगाव तालुक्यातील वासुंबे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकरी व संतांच्या वेशभूषेतील मुला,मुलींचे लेझीम पथक,पालखी मिरवणूक आणि विठ्ठल नामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणात विद्यार्थ्यांचा दिंडी सोहळा मोठया उत्साहात पार पडला. विठ्ठल रुक्मिणी,संत ज्ञानेश्वर,संत तुकाराम,संत नामदेव,संत चोखामेळा,संत जनाबाई,संत मुक्ताबाई,संत विठाबाई अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी दिंडी सोहळ्याचे आकर्षण ठरले. मुलींचे लेझीम पथक,विठ्ठल गीते गात हातात भगव्या पताका घेतलेले छोटे वारकरी,मुलींच्या डोक्यावरील तुळशी वृंदावन हे बघून जणू पंढरपूरच वासुंबे गावात अवतरल्याचे वातावरण तयार झाले होते.
शाळेच्या प्रांगणातून ब्रह्मनाथ मंदिरापर्यंत ढोल, ताशे, हलगी, लेझीम वाद्यांच्या गजरात दिंडी काढण्यात आली. ब्रम्हनाथ मंदिरामध्ये विद्यार्थ्यांना व ग्रामस्थांना फराळाचे वाटप करण्यात आले. हा दिंडी सोहळा जिल्हा परिषद शाळा वासुंबे,जिल्हा परिषद शाळा सरस्वती नगर,प्राथमिक विद्यालय दत्त माळ,सर्व अंगणवाड्या यांच्या संयुक्त विद्यमाने पार पडला.
या दिंडी सोहळ्यासाठी वासुंबे गावचे सरपंच,उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व सदस्य, शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक स्टाफ, विद्यार्थी, विद्यार्थिनी अंगणवाडी कर्मचारी, पालक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.