प्रतिनिधि अतुल काळे
- दुधास दरवाढ मिळून दूध भेसळ थांबली पाहिजे : प्रदीप माने पाटील
- तासगाव तहसीलवर धडक मोर्चा
- अन्न औषध प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे
तासगाव : दुधाला मिळणारा अपुरा दर वाढून मिळावा, दुधात होणारी भेसळ बंद व्हावी अशा प्रमुख मागण्यासाठी दूध उत्पादक संघर्ष समितीच्या वतीने तासगाव तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला असून अन्न औषध प्रशासनाच्या कामकाजावर ताशेरे ओढत दूध उत्पादक समिती आपल्या मागण्यावर ठाम असल्याची भूमिका समितीचे अध्यक्ष प्रदीप माने- पाटील यांनी घेतली आहे. दूध उत्पादकांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार रवींद्र रांजणे यांना यावेळी देण्यात आले.
बुधवार दिनांक 3 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती तासगावच्या आवारातून दुपारी १२ वा४५ मिनिटांनी मोर्चास सुरुवात झाली. स्टॅन्ड चौक, शिवतीर्थ, गुरुवार पेठ, गणपती मंदिर, सांगली नाका मार्गे तासगाव तहसील कार्यालयावर मोर्चा धडकला. तहसील कार्यालय येथे बोलताना प्रदीप माने पाटील म्हणाले, अनुदान नको दुधाला फिक्स दर पाहिजे. गाईच्या दुधास 40 रुपये तर म्हैशीच्या दुधास 60 रुपये असा दर मिळालाच पाहिजे. दुधामध्ये भेसळ होत आहे. ती थांबली पाहिजे. युरिया, कास्टिक सोडा अशी रसायने मिसळलेले मुंबईकडे पाठवले जात आहे. अन्न औषध प्रशासन या प्रकाराकडे डोळेझाकपणा करत आहे. दुधात मोठ्या प्रमाणात भेसळ सुरू असताना अन्न औषध प्रशासनाकडून कोणालाही शिक्षा झालेली दिसून आली नाही. दुधाचे टँकर मुंबईकडे जात असताना हायवेवर दुधाची तपासणी होणे आवश्यक आहे. आम्ही लोकशाही मार्गातून आंदोलन करत आहोत. जर दुधातील भेसळ थांबली नाही तर दुधाचा एकही टँकर मुंबईकडे जाऊ देणार नाही. तीव्र आंदोलन उभा करू. यास सरकार जबाबदार राहील.असा इशारा श्री. माने-पाटील यांनी दिला.
यावेळी संजयदादा पाटील (तुरची), आर.डी.पाटील (निमणी) हणमंत पाटील (येळावी) आदींची दूध दरवाढी संदर्भात भाषणे झाली. या मोर्चात दूध उत्पादक संघर्ष समितीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, दूध उत्पादक, शेतकरी सहभागी झाले होते.