सिंधुदुर्ग-विवेक परब
देवगड तालुक्यातील हिंदळे येथील वीज समस्यांबाबत सरपंच मकरंद शिंदे व हिंदळे ग्रामस्थांनी गुरुवारी आचरा येथील महावितरणचे उपकार्यकारी अभियंता अतुल पाटील यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले आहे।
हिंदळे गावातील वीज समस्या यावेळी मांडण्यात आल्या, हिंदळे गाव विद्युत वितरण कंपनीच्या आचरा विभागात येतो. तळेबाजार वरून आचरा विभागाकडे वर्ग केल्यापासुन सतत विजेचा खेळ खंडोबा सुरु आहे. ऐन उन्हाळ्यात पुर्ण मे महिना दिवसा रात्री सतत लाईट येत जात होती. काही वेळा आपल्याकडून रात्री एक वाजता सुरु झालेली पॉवर चालू केली जात नव्हती. नुकताच पाऊस सुरु झाला आहे तरी पहिल्याच पावसात आपल्या यंत्रणेचे तीन-तेरा वाजलेले आहेत. तुटपुंजी सामग्री आणि फाटलेले ग्लोव्हज घालून कर्मचारी काम करत आहेत. त्यांच्या जीविताची महावितरण कंपनीला अजिबात चिंता नाही. येत्या आठ दिवसात पोयरे, मुणगे, हिंदळे आदी गावातील विद्युत सेवा सुरळीत करा अन्यथा तिन्ही गावचे ग्रामस्थ सब डिव्हिजन कणकवली येथे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा हिंदळे लोकनियुक्त सरपंच मकरंद शिंदे यांनी दिला आहे,यावेळी सरपंच मकरंद शिंदे, उपसरपंच रुपेश राणे,
ग्रा.पं सदस्य सुभाष तेली,रमेश गोरे, सत्यवान राणे, नाना राणे, दिपक तेली उपस्थित होते।