प्रतिनिधी – अतुल काळे
- 17 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात कैद
- कोण होणार आमदार? शनिवारी ठरणार
सांगली/तासगाव : 287 तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदार संघातील मतदान मोठ्या चुरशीने पार पडले तर चोख पोलीस बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले. मतदार संघातील पारंपारिक विरोधक आबा- काका गटामध्ये ही चुरस पहावयास मिळाली. या दोन गटात काट्याची लढत झाली असून रोहित सुमन आर आर आबा पाटील आणि संजयकाका पाटील यांच्यासह एकूण 17 उमेदवारांचे भवितव्य वोटिंग मशीन मध्ये बंद झाले आहे.
महाविकास आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार रोहित पाटील, माजी आमदार सुमनताई पाटील आणि कुटुंबीयांनी अंजनी (ता. तासगाव) येथे तर महायुती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे उमेदवार संजयकाका पाटील, प्रभाकरबाबा पाटील आणि कुटुंबीयांनी चिंचणी (ता. तासगाव) येथे आपला मतदानाचा हक्क बजावला.
लोकांनी निवडणूक हातात घेतल्याने आमचा विजय घासून नाही तर ठासून होणार असा ठाम विश्वास संजयकाका पाटील यांनी मतदानानंतर व्यक्त केला तर मतदानानंतर रोहित पाटील म्हणाले, मतदार संघामधील वातावरण आपणास खूप पोषक असून या निवडणुकीत आपलाच विजय असेल असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचबरोबर कवठेमहांकाळ तालुक्यातून मनसे उमेदवार वैभव कुलकर्णी यांनी रांजणी (ता. कवठेमहांकाळ) यांनी मतदानाचा हक्क बजावला. यावेळी ते म्हणाले, ही लढाई प्रस्थापित विरुद्ध विस्थापित अशी असून जनसेवेसाठीच हा लढा असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघात प्रशासनाच्या नियोजनाप्रमाणे सकाळी 7 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली. समजलेल्या अंदाजे माहितीनुसार एकूण 312686 मतदानापैकी दुपारी 1 वाजेपर्यंत 33.51% मतदान झाले. यामध्ये 58,946 (पुरुष) 45,846 (स्त्री), 1 इतर असे एकूण 1 लाख 4 हजार 793 मतदान झाले. तर सायंकाळी 5 वाजेपर्यंत 2,04,710 इतके मतदान झाले. यामध्ये 1,03,821 (पु.), 100888 (स्त्री) आणि 1 इतर असे 65.47% मतदान झाले.
तासगाव कवठेमहांकाळ मतदार संघातून कोणता उमेदवार विधानसभेवर जाणार? कोणाची होणार जीत? कोण ठरणार भावी आमदार? याची उकल शनिवार दि. 23 रोजी निकालानंतर स्पष्ट होणार आहे तर तुतारी वाजणार का घड्याळाचा गजर खणाणणार ? याकडे आता लक्ष लागून राहिले आहे.